महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या नावावर 'सस्पेन्स', तरीही महायुतीतील नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी - AZAD MAIDAN PAHANI

मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर होत नसतानाही मुंबईतील आझाद मैदान येथे कशा प्रकारे तयारी सुरू आहे, याचा आज महायुतीतील नेत्यांनी आढावा घेतलाय.

Azad Maidan
आझाद मैदानाची पाहणी (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2024, 1:42 PM IST

Updated : Dec 3, 2024, 5:24 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय. निकाल लागून एक आठवडा उलटून गेल्यानंतरही महायुतीचा शपथविधी लांबणीवर गेला. याला अनेक कारणं आहेत. महायुतीत मुख्यमंत्री भाजपाचाच होणार, हे निश्चित आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत कमालीचा 'सस्पेन्स' आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेता आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय घेतलाय. मात्र तो जाहीर केलेला नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवाय गृहमंत्री, महसूल मंत्री ही खाती कोणाला द्यायची? यावरूनही पेच कायम असल्यामुळे शपथविधी लांबणीवर गेला होता. अखेर पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना आणि दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर झालेलं नसताना तरीसुद्धा मंगळवारी ज्या ठिकाणी शपथविधी होणार आहे, ते मुंबईतील आझाद मैदान येथे कशा प्रकारे तयारी सुरू आहे, याचा आज महायुतीतील नेत्यांनी आढावा घेतलाय.

तिन्ही पक्षाचे नेते हजर :सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केल्यानंतर आज मंगळवारीसुद्धा महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी आझाद मैदान येथे कशा प्रकारे तयारी सुरू आहे, याची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी बावनकुळे यांच्यासह शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदी नेते उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलंय. यामध्ये कला, क्रीडा, बॉलीवूड, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलंय. दरम्यान, शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना महायुतीतील नेत्यांनी आझाद मैदान येथील आढावा घेतलाय. पण दुसरीकडे शपथविधीला विलंब होत असल्यावरून विरोधकांनी टीका केलीय.

मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर नाही :एकीकडे महायुतीच्या भव्य-दिव्य शपथविधीला अवघे काही तास उरले असताना दुसरीकडे अजूनही महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून नाव समोर येत नसल्यामुळे महायुतीत मतभेद असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. महायुतीत शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे महत्त्वाच्या खात्यांवर अडून बसले आहेत. गेल्यावेळी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. त्यामुळे यावेळी स्वाभाविकपणे आणि नैसर्गिकरीत्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे पद आम्हाला मिळाले पाहिजे, अशी मागणी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलीय. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, साधू, संत, सेलिब्रिटी यासह अनेक दिग्गजांना निमंत्रित करण्यात आलं आहे. शपथविधी सोहळा अगदी जवळ येऊन ठेपलेला असताना अजूनही महत्त्वाची खाती आणि कोणाला किती मंत्रिपदे द्यायची? यावरून महायुतीत एकमत झालेलं नाही. या परिस्थितीतही आज महायुतीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली. मुख्यमंत्रिपदाचं नाव निश्चित होऊनही ते जाहीर करण्यात आलेलं नाही. भाजपाने काही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत 'धक्कातंत्र' वापरल्याचा इतिहासही ताजा आहे. त्यामुळे आता आझाद मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार? या रहस्यावरचा पडदा उचलला जाण्यासाठी आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Last Updated : Dec 3, 2024, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details