मुंबई :निवडणूक आयोगाने मतदानाची दिलेली आकडेवारी संशयाच्या भोवऱ्यात असून, जनतेच्या मतांवर दरोडा टाकण्याचे काम केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी गुरुवारी मुंबईतील टिळक भवन येथील पत्रकार परिषदेत केलाय. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान उपस्थित होते.
...तर अडीच-तीन किमी रांगा लागलेल्या आम्हाला दाखवा:मतदानाच्या दिवशी सायंकाळी निवडणूक आयोगाने पाच वाजता 58.22 टक्के मतदान झाल्याची माहिती दिलीय. मात्र, रात्री साडेअकरा वाजता 65.02 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 66.05 टक्के मतदान झाल्याची माहिती दिलीय. एकूण मतांच्या टक्केवारीत 7.83 टक्क्यांची वाढ दाखवलीय. ही एवढी वाढ शेवटच्या कालावधीत झाल्याचं म्हणत असाल तर अडीच-तीन किमी रांगा लागलेल्या आम्हाला दाखवा, याबाबत आयोगाने पत्रकार परिषदेत माहिती दिलेली नाही, याकडे नाना पटोलेंनी लक्ष वेधलंय. जनतेचा विश्वास लोकशाहीवरून उडवण्याचे महापाप भाजपा आणि निवडणूक आयोग करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.
प्रत्यक्षात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान:राज्यातील 78 मतदारसंघांत प्रत्यक्षात झालेल्या मतदानापेक्षा जास्त मतदान झाल्याची आकडेवारी समोर आल्याचा दावा नाना पटोले यांनी केलाय. पुण्यातील शिवाजीनगर येथील मतदार आता प्रतिज्ञापत्र करून आम्ही भाजपाला मते दिले नसल्याचे सांगत आहेत, असंही नाना पटोलेंनी अधोरेखित केलंय.