महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेस बंडखोर ६ वर्षांसाठी निलंबित, कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असंही रमेश चेन्नीथला यांनी ठामपणे सांगितलं.

Congress incharge Ramesh Chennith
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2024, 8:14 PM IST

मुंबई - इंडिया आघाडीने मुंबईत महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. त्यानंतर आता राज्यात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांसारख्या काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आलंय. तर दुसरीकडे महायुतीकडून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्यांचा झंझावती प्रचारदौरा आयोजित केला गेलाय. मुंबईत काँग्रेस प्रचार समितीची बैठक पार पडली आणि बैठकीनंतर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी याबाबत माहिती दिली.

काँग्रेस नेत्यांचा झंझावती प्रचार : या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, १३, १४, १६, १७ आणि १८ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा होतील. राहुल गांधी हे १२, १४ आणि १६ नोव्हेंबर रोजी राज्यात झंझावती प्रचार सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या १३, १६ आणि १७ नोव्हेंबरला प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. तेलंगणा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती चेन्नीथला यांनी दिलीय. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत, त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. तसेच राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

जाणीवपूर्वक खोटा प्रचार : चेन्नीथला पुढे म्हणाले की, १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी काँग्रेस सर्व वरिष्ठ नेते, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत हेसुद्धा उपस्थित असतील. रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने ज्या गॅरंटी जाहीर केल्या आहेत, त्या सरकार येताच लागू केल्या जातील. दुसरीकडे भाजपाकडून काँग्रेसच्या गॅरंटीविरोधात जाणीवपूर्वक चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या खोट्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जाताहेत. अनेक वर्तमानपत्रात ही जाहिरात कोणी दिली त्याचे नाव नाही. काँग्रेस भाजपाच्या या चुकीच्या प्रचाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ज्या गॅरंटी दिल्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे, पण भाजपा जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहे. महालक्ष्मी योजनेबरोबरच सर्वच गॅरंटी जाहीर करताना त्या सर्वांचा सखोल अभ्यास करून आर्थिक तरतूद कशी केली जाईल, याचा विचार करूनच त्या जाहीर केल्या आहेत, असेही रमेश चेन्नीथला यांनी सांगितलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details