नागपूर : कधीकाळी काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिलेला नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ 2009 पासून सलग भाजपाकडं आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार कृष्णा खोपडे हे भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. कृष्णा खोपडे सलग तीनदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून कृष्णा खोपडे हेच उमेदवार असतील असं सांगितलं जात असतानाच महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार, याची जोरदार चर्चा सुरु आहे. पाहू या नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचा लेखाजोखा...
पूर्व नागपूर मतदारसंघाचा इतिहास : एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या कृष्णा खोपडे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर महानगर पालिकेत ते दोन वेळा नगरसेवक झाले. त्यातच 2009 मध्ये कृष्णा खोपडे यांना भाजपानं नागपूर पूर्व मधून विधानसभेचं तिकीट दिलं. यावेळी खोपडे यांनी कमाल कामगिरी करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा पराभव केला. तेव्हापासून सलग ते या मतदारसंघातून निवडून आले. नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघात तेली, कुणबी, गुजराती, मारवाडी आणि हिंदी भाषक व्यापारी मतदार आहेत. या मतदार संघात अनेक विकासकामं केल्याचा दावा खोपडे यांच्याकडून केला जातोय. त्याबरोबरच दांडगा जनसंपर्क ही खोपडे यांच्या जमेची बाजू आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीतील प्राप्त मतं :
कृष्णा खोपडे (भाजपा) - 1,03,992
पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस) - 79,975
अजित पवार गटामधूनही इच्छुक उमेदवार : राज्यात महायुती सरकार आल्यापासून नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपाकडं राहणार हे स्पष्ट आहे. मात्र, असं असलं तरी ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश चिटणीस, प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनीही इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केलाय. पक्षानं उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत असल्याचंही आभा पांडे यांनी स्पष्ट केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून आभा पांडे यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवल्याचं बघायला मिळतंय. तसंच आभा पांडे यांचे अनेक ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. आभा पांडे या माजी नगरसेविका असून त्यापूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषवलंय. आभा पांडे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मध्य नागपुरातून उभ्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
लोकसभेत गडकरींना सर्वाधिक मतं : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याच मतदारसंघातून 73,371 मतांचं सर्वाधिक मताधिक्य प्राप्त झालं. अगोदरपासून नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय. मात्र, 2009 मध्ये पहिल्यांदा भाजपानं पराभव केल्यानंतर काँग्रेस दरवेळी उमेदवार शेवटच्या क्षणाला जाहीर करत आहे.