मुंबई -कराड येथील प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गेले असता त्यांची आणि रोहित पवार यांची समोरासमोर भेट झाली. याप्रसंगी रोहित पवार यांनी अजित पवार यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले. यादरम्यान अजित पवार म्हणाले की, "बेट्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर,..." यावरून रोहित पवार यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपा नेते राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवलीय. पवार कुटुंबाने पूर्णपणे कटकारस्थान रचून आपला पराभव केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय, ते मुंबईत बोलत होते.
कटकारस्थान करून पराभव केला? :या विषयावर बोलताना राम शिंदे म्हणाले की, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला, त्या दिवशी रोहित पवारांनी अजित पवारांची रात्री उशिरा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. पण आज प्रीतीसंगमावर सर्वांसमोर उघडपणे रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट झालीय. याप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी उघडपणे सांगितले की, "बेट्या थोडक्यात बचावलास, मी सभा घेतली असती तर..." यावरून सर्व काही उघड होतं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळावर अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी केलंय. निवडणुकीमध्ये विजय, पराजय होत असतात. परंतु अशा पद्धतीने कटकारस्थान करून एखाद्या सामान्य माणसाला हरवणे हे नीतीला मान्य नाही.
सभेसाठी पक्षाकडे वारंवार मागणी :राम शिंदे पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये सभा घ्यावी म्हणून मी पक्षाकडे वारंवार मागणी केली होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही विनंती केली होती. परंतु त्यांनी सभा दिली नाही. 7 ऑक्टोबरला मी स्वतः अजित पवार यांनी सभा घ्यावी, यासाठी त्यांना मेसेज पाठवला होता. अशा प्रकारे महायुतीचा धर्म अजित पवार यांनी पाळला नाही. रोहित पवारांनी मतदारसंघामध्ये 60 लाख रुपये वाटले, त्याची एफआयआर कॉपीसुद्धा माझ्याकडे आहे. जो काही प्रकार झाला आहे तो अतिशय वाईट असून, याबाबत पुढे काय कारवाई होते ते पाहावे लागेल, असेही राम शिंदे म्हणालेत.
बारामती ॲग्रोचा पैसा अन् गुंड :अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी राम शिंदे यांच्या पराभवाला बारामतीमधून आणलेले गुंड आणि बारामती ॲग्रोचा पैसा कारणीभूत असल्याचं सांगितलंय. ते म्हणाले की, ज्या पद्धतीने कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये घमेंडी भाषा वापरण्यात आली. राम शिंदे यांची लायकी काढण्यात आली होती. वास्तविक मतदारांनी रोहित पवारांना नाकारलं होतं. परंतु राम शिंदे यांच्या विजयाआड बारामती ॲग्रोचा पैसा आणि बारामतीमधून आणलेले गुंड आले, असंही अमोल मिटकरी म्हणालेत.
अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नाही; भाजपा आमदार राम शिंदेंचा आरोप - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
भाजपा नेते राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवलीय. पवार कुटुंबाने पूर्णपणे कटकारस्थान रचून आपला पराभव केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय.
भाजपा नेते राम शिंदे (Source- ETV Bharat)
Published : Nov 25, 2024, 2:18 PM IST