महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मविआचे प्रयत्न फसले! जानकर परतले, बीडमध्ये ज्योती मेटे कुंपणावर? - Lok Sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात अद्याप महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी यांची अंतिम यादी प्रसिद्ध झालेली नाही, तत्पूर्वी महायुतीतील घटक पक्षांना फोडून महाविकास आघाडीमध्ये सामील करण्याच्या शरद पवार आणि अन्य नेत्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. महादेव जानकर महाविकास आघाडीला स्पर्श करून परत गेले तर महाविकास आघाडीच्या वाटेवर असलेल्या ज्योती मेटे यांचं अजून तळ्यात मळ्यात आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 10:49 PM IST

मुंबई : Lok Sabha election 2024 : राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. विरोधकांची जास्तीत जास्त ताकद संपवून विरोधकांमधील दिग्गज नेते आपल्या गोटात खेचण्यात महायुती यशस्वी झाली आहे. त्यामुळे विरोधकांची असलेली उरलीसुरली ताकद हळूहळू कमी होऊ लागली आहे. महाविकास आघाडीची ( Maha vikas Aghadi) ताकद कमी होत असताना महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या दोन पक्षांच्या नाराज नेत्यांना महाविकास आघाडीत सामील करून घेत महायुतीला धक्का देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी चालवला होता. मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेऊन एकीकडे चर्चा सुरू ठेवली आणि दुसरीकडे पुन्हा एकदा महायुतीत परतण्याचा निर्णय घेतला. महादेव जानकर यांनी तयार केलेला दबाव त्यांच्या पथ्यावर पडला आहे.

सन्मानाने जागा मिळाल्याने परत :या संदर्भात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर म्हणाले की, मी महाविकास आघाडीत कधीच सामील झालो नव्हतो. त्यांच्याशी माझी चर्चा सुरू होती हे मान्य आहे. मात्र, मी महाविकास आघाडीत सामील झालो नाही. दरम्यान, महायुतीने सन्मानाने आपल्याला एक जागा देऊ केली आहे. जेव्हा महायुतीच्या जागावाटपांची यादी जाहीर होईल, तेव्हा ती जागा नेमकी कोणती आहे, हे स्पष्ट होईल. त्यामुळे आपण महायुतीमध्ये होतो आणि महायुतीमध्येच राहणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे.

उद्या निर्णय घेणार :महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) या सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याची तयारीसुद्धा केली आहे. महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे ज्योती मेटे महाविकास आघाडीत सामील होऊन पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, ज्योती मेटे यांच्या या चालीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली, त्यामुळे ज्योती मेटे यांची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे. या संदर्भात बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या की, मी निवडणूक लढवणार यावर ठाम आहे. महायुतीत मला काय संधी देते हे मी पाहणार आहे. अन्यथा बुधवारी मी माझा निर्णय जाहीर करणार असं त्यांनी सांगितलं आहे.

फडणवीस यशस्वी होणार का? : महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि सदाभाऊ खोत यांच्या रयत रयत क्रांती संघटनेला सोबत ठेवण्यात महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली आहे. मात्र, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनाही सोबत ठेवण्यात जर फडणवीस यशस्वी झाले तर मात्र महाविकास आघाडीच्या महायुती फोडण्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही, असं म्हणता येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details