मुंबई Maharashtra Vidhan Sabha Election : महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळं त्यांचे नेते सध्या हवेत आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या विजयामध्ये आमचाही हिस्सा आहे. अनेक जागांवर आमचाही हातभार लागला आहे. त्यामुळं आम्हाला डावलणं चुकीचं आहे. महाविकास आघाडीनं आम्हालाही सन्मानानं जागा वाटपात सहभागी करून घ्यावं आणि पुरेशा जागा द्याव्यात. याबाबत पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत शुक्रवारी किंवा शनिवारी बैठक होईल, त्यामध्ये निर्णय घेतला जाईल, असं अबू आसिम आझमी (Abu Asim Azmi) यांनी स्पष्ट केलंय.
महाविकास आघाडीकडून सन्मान मिळणं गरजेचं :नुकत्याच झालेल्या समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत समाजवादी पक्षानं राज्यात 30 ते 35 जागांवर निवडणूक लढवण्यावर विचार विनिमय करण्यात आला. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाला महाविकास आघाडीसोबत लढायचं आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून देखील आम्हाला योग्य तो सन्मान मिळणं गरजेचं आहे, असं आझमी यांनी सांगितलं.
अखिलेश यादव घेणार अंतिम निर्णय : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढायचं की महाविकास आघाडीसोबत लढायचं याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. लवकरच समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत आझमी यांची बैठक होणार असून या बैठकीत अखिलेश यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली जाईल. राज्यातील समाजवादी पक्षाच्या कामगिरीची आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारीबाबत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर अखिलेश यादव याबाबत अंतिम निर्णय घेतील, तो निर्णय आमच्यासाठी बंधनकारक असेल अशी माहिती, अबू आझमी यांनी दिली.
त्यानुसार महाराष्ट्रात उपाययोजना करणार :सध्या महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व शिवसेना उबाठा पक्षाकडून समाजवादी पक्षाला पुरेसा सन्मान मिळत नसल्याबाबत पक्षाध्यक्ष यांना माहिती देण्यात येईल. त्यानंतर अखिलेश यादव जो निर्णय घेतील त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येईल, असं आझमी यांनी स्पष्ट केलंय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे मानखुर्द मतदारसंघातून अबू आझमी आणि भिवंडी पूर्व मतदारसंघातून रईस शेख हे दोन उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोचले होते.
हेही वाचा -
- अखेर भारत जोडो न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी! म्हणाले, "भाजपा हटवा देश वाचवा"
- 'अडवाणींना जाहीर झालेला भारतरत्न म्हणजे एक प्रकारे फार्स', प्रकाश आंबेडकरांची टीका; ओवेसींचीही तिखट प्रतिक्रिया
- अखिलेश यादवांची काँग्रेससोबत युतीची घोषणा, उत्तर प्रदेशात देणार लोकसभेच्या 11 जागा