अहमदनगरAhmednagar Election 2024 Result :महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल येत आहेत. अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांचा पराभव झाल्याचं चित्र आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांचाही पराभव झाला आहे. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभवाची धूळ चारलीय.
46 वर्षे काँग्रेसचं वर्चस्व : अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा परिसर निजामशाही सुलतानांची राजधानी होता. हा परिसर सुलतान अहमद निजामशहानं वसवला होता. या घराण्यातील पहिल्या सुलतान अहमद निजामशाहनं याची स्थापना केली होती. महाराष्ट्रातील अहमदनगर ही जागा एकेकाळी काँग्रेस उमेदवाराच्या विजयाची हमी ठरली होती. 1952 ते 1998 अशी सलग 46 वर्षे काँग्रेसचं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होतं. मात्र, 1998 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. शिवसेनेनं पक्षाचा विजय रथ रोखला. 1998 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करुन विजय मिळवला होता.
मतदारसंघावर काँग्रेसचं एकहाती सत्ता : अहमदनगर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचं एकहाती वर्चस्व होतं. सलग 46 वर्षे त्यांनी तिथं विजय मिळवला. 1952 मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत काँग्रेसनं पहिला विजय नोंदवला आणि उत्तमचंद आर बोगावत खासदार म्हणून निवडून आले. 1957 च्या निवडणुकीत येथील मतदारांनी आर. के. खाडिलकर यांना विजय मिळवून दिला. 1962 मध्ये मोतीलाल फिरोदिया, 1967 मध्ये अनंतराव पाटील, 1971 मध्ये अण्णासाहेब शिंदे, पुन्हा 1977 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर शिंदे विजयी झाले. चंद्रभान आठरे पाटील 1980 साली खासदार झाले. काँग्रेसचे यशवंतराव गडाख पाटील 1984, 1989 आणि 1991 मध्ये सलग तीनवेळा विजयी होऊन खासदार झाले. 1994 मध्ये या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. त्यातही काँग्रेसचे मारुती देवराम शेळके विजयी झाले होते. 1996 च्या निवडणुकीतही शेळके काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते.
1998 शिवसेनेचा विजय : परंतु 1998 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. शिवसेनेनं कॉंग्रेसचा विजय रथ रोखला. 1998 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करुन विजय मिळवला होता. त्यानंतर 1999 मध्ये झालेल्या निवडणुकीत ही जागा भाजपाच्या खात्यात गेली. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दिलीपकुमार गांधी खासदार झाले. 2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम गडाख विजयी झाले. त्यानंतर ही जागा भाजपानं काबीज केली. 2009 मध्ये भाजपाचे दिलीपकुमार गांधी पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. 2014 मध्येही गांधी येथून विजयी झाले होते. नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते विजयीही झाले.
एकमेकांसोबत नातेसंबंध :राज्यातील क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा असलेला अहमदनगर जिल्हा जसा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसाच तो सगेसोयऱ्यांच्या राजकारणासाठी देखील प्रचित आहे. प्रत्येक निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात सगेसोयऱ्यांचं राजकारण हे प्रभावी ठरतं. अहमदनगर जिल्ह्यात सगेसोयऱ्यांच्या राजकारणाला फार मोठं महत्त्व आहे. अहमदनगरच्या राजकारणातील मोठे नेते असलेल्या बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले, राजेंद्र नागवडे, शिवाजी कर्डीले आणि संग्राम जगताप यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत. जरी वेगवेगळ्या पक्षात ही सर्व घराणे असले तरी राजकीय निवडणुकांमध्ये ते एकमेकांना मदत करताना अनेक वेळेला पाहायला मिळालंय. यंदा अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत झाली. लोकसभेमध्ये सगेसोयऱ्यांच्या मुद्द्याला विशेष महत्त्व जरी मिळत नसलं, तरी निवडणूक निकालावर कमी अधिक प्रमाणात याचा परिणाम झाल्याचं दिसून येतोचं. नगर जिल्ह्यातील बडे नेते जरी वेगवेगळ्या पक्षात असले, तरी आपापले मतदारसंघ आणि बालेकिल्ले वाचवण्यासाठी ते एकमेकांना मदत करत असतात. या सगे-सोयऱ्यांच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असलेले भाजपाचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचे जावई राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे महायुतीत एकत्रित आहेत. त्यामुळं सगेसोयऱ्यांच्या राजकारणाचा सुजय विखे यांना फायदा होणार असल्याचं बोललं जात होतं.
यांच्या भोवती फिरतं राजकारण : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुजय विखे विरुद्ध नीलेश लंके अशी प्रत्यक्ष दिसत असली, तरी ती विखे विरुद्ध शरद पवार अशीच असल्याचा उल्लेख महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. यामुळं विखे कुटुंबीय विरुद्ध शरद पवार यांच्यामध्ये गेल्या 35 ते 40 वर्षात उडालेल्या राजकीय संघर्षाला उजाळा मिळाला. शरद पवार यांच्या विरोधात विखे कुटुंबातील तिसरी पिढी संघर्ष करतेय. मात्र पवार कुटुंबातील तिसरी पिढी, रोहित पवार आणि सुजय विखे यांच्यामध्ये मात्र जिल्ह्यात तेवढ्या संघर्षाची धार दिसत नाही. याचा इतिहास म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पूर्वी शरद पवार विरुद्ध शंकरराव चव्हाण असा वाद होता. चव्हाण गटात बाळासाहेब विखे यांचा समावेश होता. चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्रात पवार विरोधी गटाचे नेतृत्व विखे यांच्याकडं आलं. त्याचेच पडसाद जिल्ह्यात आताही उमटत आहेत. सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात पवार गटाचे नेतृत्व यशवंतराव गडाख, नंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडं आले. जिल्हा परिषद असो की जिल्हा बँक, पवार काँग्रेसचे असोत की राष्ट्रवादीचे, जिल्ह्यात पवार-गडाख-थोरात विरुद्ध विखे असाच कायम राजकीय संघर्ष झाला. राजकीय कुरघोड्याही याच पध्दतीनं केल्या-खेळल्या जातात.
असा आहे राजकीय संघर्ष : या संघर्षाला खऱ्या अर्थानं धार चढली ती बाळासाहेब विखे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर. त्यांनी पवार यांना शह देण्यासाठी दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांची मोट बांधत जिल्हा विकास आघाडीचा प्रयोग केला. महाराष्ट्र पाणी परिषदेची स्थापना करत, पुणे जिल्ह्यातून नगरचं पाणी अडवलं जातं, अशी भूमिका घेत शरद पवार विरोधात मोर्चेबांधणी केली. पाणी परिषदेच्या माध्यमातून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी पश्चिमेकडं वळवण्याची चळवळ सुरु केली, तेव्हा मुख्यमंत्री पदावर असलेल्या शरद पवार यांनी या संकल्पनेला प्रोत्साहन दिलं नव्हतं. या संघर्षात मैलाचा दगड ठरला तो 1991 मधील विखे-गडाख निवडणूकीचा खटला. त्याची झळ मुख्यमंत्री शरद पवार यांना बसली, न्यायालयानं त्यांच्यावर ठपका ठेवला. त्यातून पवार-विखे राजकीय वैमनस्याला अधिक धार चढली. 2007-08 मध्ये पवार-थोरात गटानं, थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी मोर्चेबांधणी केली. राधाकृष्ण विखे यांनी त्यावर कुरघोडी करत, पत्नी शालिनीताई विखे यांना अध्यक्षपद मिळवून दिलं होतं.
सुजय विखे यांचा राजकीय प्रवास : राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेच्या अध्यक्षपदापासून झाली. त्याचवेळी विखे यांच्या वर्चस्वाखालील ही संस्था बरखास्त करुन त्यावर प्रशासक नियुक्तीची कारवाई करण्यात आली. त्यावेळी ऊर्जामंत्री होते अजित पवार. शरद पवार यांच्याच पावलावर पाऊल टाकून अजित पवार यांनीही जिल्ह्यात विखेविरोधी मोहिमेला चालना दिली. ‘शिर्डी’ची जागा राखीव व नगरची जागा राष्ट्रवादीकडं असल्यानं, नगर-औरंगाबाद जागेची अदलाबदल काँग्रेस-राष्ट्रवादीनं करावी. किमान सुजय विखे यांना राष्ट्रवादीनं नगरमधून उमेदवारी द्यावी, यासाठी 2019 मध्ये प्रयत्न झाले. मात्र पवार यांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळं अखेर सुजय विखे यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळीही राष्ट्रवादीकडं नगरसाठी उमेदवार नव्हता. शरद पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांना निवडणूक लढवण्यास तयार केलं. तसंच निवडणुकीत जातीनं लक्ष घातलं. मात्र सुजय विखे विजयी झाले. पवार-थोरात यांच्या वर्चस्वाखालील जिल्हा बँकेचं अध्यक्षपद दोन वर्षांपूर्वी विखे यांनी भाजपाकडं आणलं.