पुणेPune Drug Case : पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यात तयार होत असलेलं ड्रग्ज लंडनसह इतर देशांमध्ये पुरवणारा संदीप दुनियाचा मुख्य साथीदार वीरेंद्र सिंग बरोरिया याच्या विरोधात पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजावली आहे. आरोपी वीरेंद्र सिंग हा मूळचा दिल्लीचा रहिवासी असून तो कुरकुंभ एमआयडीसीत बनलेलं ड्रग्ज दिल्ली मार्गे विविध देशांमध्ये पुरवत होता, असा त्याच्यावर आरोप आहे.
वीरेंद्र सिंग नेपाळमार्गे पळाला :पुणे पोलिसांनी दिल्लीत केलेल्या छापेमारीत आरोपी वीरेंद्र सिंग हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तो नेपाळ मार्गे इतर राष्ट्रात पळून गेल्या असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी वीरेंद्र सिंग याच्या विरोधात दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी एनडीपीएसचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांना 25 लाखांचं बक्षीस :पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये तब्बल 4000 कोटीचं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं. कालच पुणे पोलिसांचं कौतुकसुद्धा गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी करुन त्यांना 25 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. परंतु, याचे धागेदोरे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. यापूर्वी आठ जणांना यात अटक करण्यात आली होती. त्यामुळे विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं आहे.
पोलिसांची एक टीम दिल्लीला रवाना :यासंदर्भात पुणे पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, ड्रग्जचा पुरवठा दिल्लीत केला जायचा. यामध्ये वीरेंद्र सिंग आणि संदीप दुनिया यांचा संबंध आढळून आला होता. त्यानंतर दिल्लीत एक टीम गेली होती. त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ही लूक आउट नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे.