नाशिक : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होतो. या काळात देशभरातून हजारो साधू, महंत तसेच कोट्यवधी भाविक येत असतात. त्यामुळे प्राचीन व धार्मिक नाशिकचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणूक नाशिकमधूनच लढवावी, अशी मागणी नाशिकच्या महंतांनी केली होती. मात्र त्याबाबत अद्याप भाजपाकडून कुठलंच स्पष्टीकरण आलं नाही. अशातच नाशिक लोकसभा निवडणुकीत आपलं भवितव्य आजमावण्यासाठी तीन महाराजांनी इच्छा व्यक्त केली आहे.
कोण तीन महाराज निवडणुकीसाठी आहेत इच्छुक?
- जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभक्ती आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणूक लढवणार असल्याचं भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितलं. नाशिक मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या दोन लाखाहून अधिक आहे.
- स्वामी कंठानंद यांच्यासाठी नाशिकच्या काही उद्योजक, वैद्यकीय क्षेत्र, शेती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून स्वामींच्या उमेदवारीसाठी साकडे घातले आहे. स्वामी कंठानंद हे रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य परंपरेतील आहेत. त्यांनी नाशिकमध्ये 2005 मध्ये श्रीकृष्ण आरोग्य संस्था सुरू केली. त्या माध्यमातून सेवाकार्य करीत आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीप्रमाणं नाशिक तीर्थक्षेत्रमधून लोकसभा निवडणूक लढवली, तर हा महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ ठरेल यामुळं रखडलेली कामं मार्गी लागतील. नाशिकचा 'मंत्रभूमी ते यंत्रभूमी' हा प्रवास खऱ्या अर्थानं पूर्ण होईल, अशी इच्छा महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केली होती. मात्र पंतप्रधान मोदींनी हा प्रस्ताव मान्य न केल्यास नाशिकच्या धार्मिक, अध्यात्मिक विकास व पर्यटन वाढवण्यासाठी आपण इच्छुक आहोत. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिल्यास आपण नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करु, असं मत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.