नागपूर Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या मतमोजणीला सुरुवात झाली असून नागपूरसह रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एकाचं ठिकाणी होत आहे. कळमनाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. दोन मतदारसंघाची मतमोजणी एकाच जागी होत असल्यानं पोलीस यंत्रणेवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळेचं या संपूर्ण परिसरात तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपुर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात सहा-सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. विधानसभा निहाय मतमोजणीसाठी 20 टेबल लावण्यात आले असून नागपूर, रामटेक मध्ये एकूण 240 टेबलांवर ईव्हीएमची (EVM) मतमोजणी होत आहे. तर तात्पुरत्या पोस्टलच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी 10 टेबल लावण्यात आले होते. दरम्यान, मतमोजणी सुरळीतपणे पार पडावी याकरिता दोन्ही मतदारसंघ मिळून साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 3 हजार पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
मोबाईल वापरास बंदी : मतमोजणी केंद्राला पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या परीसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. सीआरपीएफ, एसआरपीएफच्या सशस्त्र जवानांसह नागपूर पोलिसांचे जवान हे ठिकठिकाणी तैनात असल्याचं बघायला मिळतंय.