पुणे Lok Sabha Election Result 2024 : राजकारणातील 'चाणक्य' म्हणून शरद पवार यांना ओळखलं जातं. परिस्थिती कशीही असो, परंतु त्या परिस्थितीला कलाटणी देण्याचं बळ असणारे लढवय्ये नेते ते आहेत हे त्यांनी दाखवून दिलं आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला आहे. देशात आणि राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. राज्यात महाविकास आघाडीनं तब्बल ३० जागा जिंकल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानं १० पैकी ८ जागा जिंकल्या असून पुन्हा एकदा शरद पवार महाराष्ट्राचे 'किंग मेकर' या भूमिकेत पाहायला मिळाले. अशातच पक्ष फुटीनंतरही भारतीय जनता पार्टीला शरद पवार यांचा अभ्यास करता आला नसल्याचं जाणकाराकडून सांगितलं जात आहे. तसंच अजित पवार यांना महायुतीत सहभागी करून न घेता भाजपानं निवडणूक स्वबळावर लढवली असती तर नक्कीच भाजपाला त्याचा फायदा झाला असता, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.
शरद पवारांना राजकारणातील 60 वर्षाचा अनुभव आला कामी :याबाबत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पाटील म्हणाले की, यंदाची लोकसभेची निवडणूक बघितली तर राज्यातील पक्षफुटीच्या राजकारणामुळे नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळाला. महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीत शरद पवार यांना संपवण्याची भाषा भाजपाकडून करण्यात आली होती. जेव्हा-जेव्हा शरद पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला तेव्हा-तेव्हा शरद पावर हे ताकदीनं उभे राहिल्याचा इतिहास आहे. पक्ष फुटीनंतर अनेक मतदार संघात शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेसाठी उमेदवार सापडणार नाही अशी परिस्थिती होती. परंतु शरद पवार यांच्या राजकारणातील ६० वर्षाच्या अनुभवमुळे त्यांनी मतदार संघात मोट बांधत उमेदवार दिले असल्याचं, पाटील यांनी सांगितलं.
या मुद्यांवर मतदारांनी दिली पवारांना साथ : "पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर या वयात अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांची साथ सोडून जाणं मतदारांना पसंत पडलं नाही. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांकडून शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे देखील नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळाला. तसंच विकासाच्या मुद्द्यावर पवारांना सहानुभूती मिळाली. आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मतभेद विसरून एक दिलानं काम केल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालं." असं पाटील त्यांनी यावेळी सांगितलं.