पालघरPalghar Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणूक कौरव-पांडवातील युद्ध असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मित्रपक्ष पांडवाची भूमिका बजावत आहेत. तसंच विरोधी इंडिया आघाडीमध्ये कौरव सैन्य असून त्यांचा पराभव करण्यासाठी पांडव सेैन्याला मदत करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
विरोधकांची खिचडी :सभेत बोलताना फडणवीसांनी खासदार संजय राऊत यांची तुलना ‘पोपटलाल’ अशी केली. ते म्हणाले, निवडणूक ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा अन्य संस्थांची नाही. तर ही निवडणूक देशाचा नेता निवडण्यासाठी आहे. देशाला सुरक्षित कोण ठेवेल, सामान्यांच्या आशा-आकांक्षा कोण पूर्ण करेल, हे ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे. महाभारतातील युद्धाप्रमाणे हे लोकसभेचे युद्ध आहे. एकीकडं मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, अजित पवार, रामदास आठवले आदींची फळी आहे, तर दुसरीकडं राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कौरव सैन्य असून त्यांच्या आघाडीची खिचडी झाली आहे.
पंतप्रधानपदासाठी संगीत खुर्ची :विरोधकांनापंतप्रधानापदाचा उमेदवार ठरवता आलेला नाही. संगीत खुर्चीप्रमाणे पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा खेळ करण्याचा त्यांचा प्रयत्न मतदारांनी हाणून पडला पाहिजे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या विकासाची ट्रेन धावतेय. मोदींच्या इंजिनाला अनेक डबे असून त्यात आदिवासी, अल्पसंख्यांक अशा सर्व घटकांना सामावून घेण्याची ताकद आहे. विरोधकांकडं केवळ इंजिनच असून त्यांच्या इंजिनाला डबेच नसल्यामुळं सामान्यांना तिथं स्थान नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या इंजिनात फक्त त्यांच्या कुटुंबांना जागा असून सामान्य परिवारासाठी स्थान नाही. या वेळी फडणवीस यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांचा नामोल्लेख टाळून बहुजन विकास आघाडी म्हणजे काही सिंह नव्हे, अशी टीका केली.
कोटीच्या कोटी उड्डाणे :गेल्या दहा वर्षात मोदी यांनी काय काय केलं, याचा पाढा वाचताना फडणवीस म्हणाले, की "मोदींनी जगात चमत्कार करून दाखवला. गेल्या दहा वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढलं. वीस कोटी लोकांना स्वतःचं घर दिलं. पन्नास कोटी लोकांना गॅस दिला. ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. 65 कोटी युवकांना विनातारण कर्ज दिलं. आता या कर्जाची मर्यादा वीस लाख रुपये करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगार दिले. ऐंशी लाख बचत गट स्थापन केले. दहा कोटी महिलांना मदत केली. आता महिलांना लखपती करण्याचं धोरण घेतलं आहे. याशिवाय पुढच्या निवडणुकीत 33 टक्के जागा विधानसभा, संसदेत महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे."