अमरावती Amravati Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा शुक्रवारी (26 एप्रिल) पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुलभपणे राबविता यावी, यासाठी गुरुवारी (25 एप्रिल) सकाळी अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रासह अचलपूर, तिवसा, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी या विधानसभा मतदान क्षेत्रातील एकूण 2536 मतदान केंद्रांवर मतदान पथक रवाना झालेत. तर मेळघाटातील अति दुर्गम अशा 136 मतदान केंद्रांवर मतदान पथक मतदान साहित्यांसह बुधवारीच रवाना झाले आहेत.
परिवहन महामंडळाच्या 227 गाड्या : अमरावती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदान पथकांसह निवडणुकीसाठी लागणारे साहित्य पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण 227 गाड्यांची व्यवस्था करण्यात आलीय. बडनेरा विधानसभा मतदारसंघात 46 बस, तर अमरावती विधानसभा मतदारसंघात 33, तिवसा मतदार संघात 37, दर्यापूर मतदार संघात 44, अचलपूर मतदारसंघात 29 आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात एकूण 35 राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पोलींग पार्ट्यांना घेऊन रवाना झाल्या आहेत. यासह एकूण 22 ट्रक 84 जीप आणि 20 मिनीबस यांची देखील व्यवस्था करण्यात आलीय. मेळघाटातील अतिदुर्गम गावांमध्ये पोहोचण्यासाठी 60 क्रुझर गाड्यांची व्यवस्था करण्यात आलीय.
1983 मतदान केंद्रावर होणार मतदान : अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 78 मतदार आहेत. या मतदारांना मतदान करण्यासाठी एकूण 1983 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी बडनेरा विधानसभा मतदारसंघात 337 मतदान केंद्र असून अमरावती विधानसभा मतदारसंघात 322, तिवसामध्ये 319, दर्यापूर मध्ये 342, मेळघाटात 354 आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघात 309 मतदान केंद्र आहेत.