नितीन गडकरी नाशिक सभा (reporter) नाशिक Nitin Gadkari Nashik Rally :नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच यावेळी नितीन गडकरी यांनी काँग्रेसनं नं केलेल्या कामांचा आणि मोदी सरकारनं मागील 10 वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखाच वाचून दाखवला.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी? : सभेला संबोधित करत असताना नितीन गडकरी म्हणाले की, "60 वर्षांत जे काँग्रेसनं केलं नाही, ते दहा वर्षांत पंतप्रधान मोदींनी करुन दाखवलं. अनेक रस्त्यांची कामं मंजूर झालीत, आचारसंहितेनंतर ती लगेच सुरू होतील. मनाली रोहतांग पास हा साडेतीन तासांचा प्रवास अटल टनलमुळं अवघ्या 8 मिनिटात होतो. लेह लडाख, काश्मीर, हिमाचल प्रदेश, सूरत, नाशिक, त्रिवेंद्रम कन्याकुमारी हा 8 पदरी प्रमुख राष्ट्रीय महामार्ग मंजुर झालाय, ही नाशिककरांसाठी खुशखबर आहे. अवघ्या 10 वर्षांत झालेल्या या विकासाचं खरं श्रेय जनतेला जातं. तुम्ही निवडून दिलं, त्यामुळं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तसंच तुमच्यामुळंच मी मंत्री झालो आणि म्हणून आम्ही हे करू शकलो."
देशात रामराज्य आणायचं हेच आमचं ध्येय : पुढं ते म्हणाले की, "कम्युनिस्ट पार्टीला संपवण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी केलं. त्यानंतरच विकासाची गंगा सुरू झाली. देशात पैशाची कमी नाही, मात्र इमानदारीनं काम करणारा माणूस पाहिजे. या देशाला रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक नीतीची गरज असून आम्ही केलेल्या प्रत्येक योजनेत गरिबांचं हित पाहिलंय", असंही ते म्हणाले. तसंच "आम्ही राम मंदिर बांधलं, पण राम मंदिर बांधणं हेच आमचं उद्दिष्ट नव्हे. तर या देशात आम्हाला रामराज्य आणायचंय. या देशाला विश्वगुरू करायचंय. गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या योजना पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आणल्या. त्या आधारावर देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वासही यावेळी गडकरींनी व्यक्त केला.
संविधान कधीच बदलणार नाही : "विरोधक कन्फ्युज करणारा प्रचार करत आहेत. संविधान बदलणं हे कधीही आणि कुणालाही शक्य नाही. तसंच मुस्लिमांना मिसगाईड केलं जातंय. ज्या योजना सरकारनं लागू केल्या, त्यात सगळ्यांचा विकास व्हावा हेच आमचं ध्येय आहे", असंही ते म्हणाले.
हेही वाचा -
- माणूस जातीनं नाही, तर गुणानं मोठा असतो; जातीचं राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितीन गडकरींनी फटकारलं - Lok Sabha Election 2024
- नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, कोण कुणाशी कधी लग्न करतं अन्... - Lok Sabha Election 2024
- यवतमाळच्या पुसदमध्ये नितीन गडकरी यांना भाषणादरम्यान भोवळ - Nitin Gadkari faints