मुंबई :विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, अनेक पक्षांनी उमेदवार देण्यास सुरुवात केलीय. भाजपानंही पहिली यादी जाहील केलीय, अशातच आता विविध मतदारसंघातील अंतर्गत गटबाजी समोर येत आहे. कुर्ला विधानसभा मतदारसंघातही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. सध्या इथे शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर विद्यमान आमदार असून, महविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळेच कुर्ला विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर तयारीला लागल्या असून, प्रविणा यांना उमेदवारी दिल्यास त्यांना मतदान न करण्याचा निर्णय कुर्ला कुरेशीनगर येथील स्थानिक नागरिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलाय.
ठाकरे गटाला मुस्लिम समाजाची मतं: या आधी प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी देण्यास कुर्ल्यातील मराठा समाजाने विरोध केला होता. आता कुरेशीनगर येथील नागरिकांनी विरोध केल्याने प्रविणा मोरजकर यांची उमेदवारी धोक्यात आल्याचं बोललं जातंय. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती. वर्षानुवर्षे ठाकरेंपासून लांब असणाऱ्या मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना साथ दिलीय. मात्र, विधानसभा निवडणुकीत हाच मुस्लिम समाज ठाकरेंपासून दूर जाण्याची चिन्हं आहेत.