अमरावतीIndian redwood tree :एखाद्या झाडावर कुऱ्हाडीने किंवा दगडाने वार केला आणि त्यातून प्राणी किंवा माणसाच्या शरीरातून निघतं तसं रक्त निघालं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. इंडियन रेड वूड ट्री, रोहण, रोहिणी, मासरोहिणी, रक्तरोहिणी, रक्तचंदन अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या झाडातून माणसाच्या शरीरातून निघतं अगदी तसाच द्रव घाव मारल्यावर बाहेर येतो. आता हे झाड दुर्मीळ होत चाललं असलं तरी महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र हे झाड पाहायला मिळतं. अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या डोंगर भागात तसंच पोहरा जंगलात हे झाड आहे. या झाडाच्या विविध वैशिष्टांसंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पूर्वीच्या काळी आयुर्वेदात या झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्याचं समोर आलं. आज देखील आयुर्वेदात या झाडाचं महत्त्व कायम असल्याची माहिती अमरावती येथील नरसम्मा हिराया महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिन तिप्पट यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
हे आहे झाडातून येणाऱ्या लाल रक्ताचं कारण :खरंतर प्रत्येक वृक्षामध्ये रेझिन्स असतात. ज्याप्रमाणे माणसाला इजा झाल्यावर त्याच्या शरीरातून रक्त बाहेर येतं त्याचप्रमाणे झाडाला इजा झाली तर त्यामधून रेझीन बाहेर पडतं. अनेक झाडांमध्ये पिवळ्या किंवा राखाडी रंगाचं हे रेझीन बाहेर पडतात. मास रोहिणी हे झाड कडुलिंब वर्गातील असून बाभळीच्या झाडाप्रमाणे या झाडातून निघणारं रेझीन हे लाल रंगाचं असतं. यामध्ये विष प्रतिकारक्षमता असल्यामुळे या झाडातील रेझीन हे लाल रंगाचं आहे. या झाडातून निघणारे हे रेझीन चिकट आणि घट्ट असून ते झाडातून बाहेर निघाल्यावर बराच वेळानंतर रक्तासारखे गडद लाल रंगाच्या रक्ताप्रमाणे भासतात, असं प्रा. डॉ. सचिन तिप्पट यांनी सांगितलं.
असं आहे या वृक्षाचं आयुर्वेदात महत्त्व :आयुर्वेदामध्ये मास रोहिणी या वृक्षाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पूर्वीच्या काळात एखाद्याचे हाड मोडले तर ते जोडण्याकरिता या मासरोहिणी वृक्षाच्या सालीचा लेप हाड जोडण्यासाठी वापरला जायचा. तसंच सूज कमी होण्यासाठी देखील हा लेप गुणकारी आहे. पचनासाठी या झाडाची साल उपयुक्त आहे. पोट दुखत असेल तर या सालीचा औषध म्हणून उपयोग फायदेशीर ठरणार आहे. मासिक पाळी दरम्यान महिलांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर याच्या सालीमध्ये असणाऱ्या 20 प्रतिकारक गुणधर्माचा लाभ होतो. पूर्वी अशा सर्वच विचारांसाठी या वृक्षाला महत्त्व होतं आज देखील आयुर्वेदात या झाडाची पानं फुल फळ साल आणि मूळ यांचा वापर विविध आजारांसाठी विविध औषधी तयार करण्यासाठी केला जात असल्याची माहिती देखील प्राध्यापक डॉ. सचिन तिप्पट यांनी दिली.