छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Leopard :गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत असलेला बिबट्या प्रत्यक्ष नजरेस पडत नसल्यानं, तो नेमका गेला कुठं?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर, दुसरीकडं समाज माध्यमांवर विविध भागांमधील जुने व्हिडिओ व्हायरल होत, असल्यानं अफवा पसरली आहे. लोक बाहेर पडताना विचार करत असून काही ठिकाणी पालकांच्या मागणीमुळं शाळांना सुट्टी द्यावी लागली आहे. वन विभागानं काही ठिकाणी पिंजरे लाऊन त्याला पकडण्यासाठी सापळा लावला आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून बिबट्याला पकडण्यात यश आलं नाही.
चार दिवसांपूर्वी दिसली बिबट्याची झलक :छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या चार दिवसापासून बिबट्यानं दहशत निर्माण केली आहे. मात्र, बिबट्या नेमका आहे कुठे? याबाबत संभ्रम निर्माण झाले आहेत. चार दिवसांपूर्वी उल्कानगरी भागात वीज खंडित झाली होती, त्यावेळी महावितरणचे लाईनमन तांत्रिक बिघाड पाहण्यासाठी बाहेर पडले असताना, त्यांना मध्यरात्री बिबट्याची पहिली झलक पाहायला मिळाली. त्यावर परिसरातील नागरिकांना त्यांनी सतर्क केलं. सकाळी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली असता, दोन कॅमेऱ्यांमध्ये बिबट्या कैद झाला. त्यामुळं नागरिकांनी तातडीनं वन विभागाला याची माहिती दिली. बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली. जवळ असलेल्या नाल्यातून हा बिबट्या लोकवस्तीत आला असावा असा अंदाज आहे. मात्र, पुढं दोन दिवस या बिबट्याचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही.