प्रतिक्रिया देताना समय सूचक मुलगा नाशिक Leopard in Residential Area : जिल्ह्यातील मालेगाव शहरात भरवस्तीत बिबट्या दिसला. या बिबट्यानं एका घरात प्रवेश करताच चिमुकल्यानं हुशारी दाखवत बिबट्याला खोलीत बंद केल्यानं वन विभागानं काही वेळातच बिबट्याला जेरबंद केलं. मुलानं न घाबरता प्रसंगावधान दाखवल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.
चिमुकल्यानं दाखवलं प्रसंगावधान : गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात बिबट्याच्या मुक्त संचार असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मालेगाव येथील नामपूर रोडवरील एका लॉन्सच्या खोलीत बिबट्या शिरला. यावेळी मोहित विजय आहिरे हा लहान मुलगा मोबाइलवर गेम खेळत असताना त्याला बिबट्या खोलीत शिरतांना दिसला. त्यानं क्षणाचा ही विचार न करता बिबट्याला खोलीत जेरबंद केलं. यानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभाग, पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन देत जेरबंद केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, मालेगाव, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके सध्या बिबट्यांचे हॉटस्पॉट झाले आहेत. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होतात. या नद्यांच्या आजुबाजूला ऊसाचं मोठं क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी ऊसाचं शेत ही सुरक्षित जागा असल्यानं बिबट्याच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. याबरोबर मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्यानं बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येतंय.
घरात घुसलेला बिबट्या चिमुकल्यामुळे झाला जेरबंद कशी घ्याल काळजी : नाशिक जिल्ह्यात ऊसाचं क्षेत्र मोठं असल्यानं बिबट्यांना लपण्यासाठी ही चांगली जागा असते. ऊसतोड करतांना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि मजुरांनीदेखील काळजी घेणं गरजेचं आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी. त्यामुळे बिबटे, लांडगे, तरस तसंच वन्यप्राणी जवळ येणार नाहीत. अनेक वेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचं दिसून आलंय. अशात पालकांनी काम करतांना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन वन विभागानं केलंय.
हेही वाचा :
- पुण्याच्या प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या अखेर जेरबंद; पिंजऱ्यात अडकला
- बिबट्याची दहशत कायम; अहमदनगरच्या अंबिका नगरमध्ये एकावर हल्ला, पाहा व्हिडिओ