मुंबई Laxman Hake On Caste Census : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जातनिहाय जनगणनेला पाठिंबा देण्याचे संकेत दिले. जातनिहाय जनगणना करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनुकूल असल्याचं अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित झालाय. जातनिहाय जनगणनेची मागणी यापूर्वीही अनेकदा करण्यात आली. मात्र, मागणी करणारे सत्तेत आल्यानंतर मागणी विसरतात, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली. जोपर्यंत जनगणना कायदा 1948 मध्ये बदल होत नाही, तोपर्यंत जातनिहाय जनगणना शक्य नाही, असंही ते म्हणाले.
काँग्रेस असो की भाजपचा एकच अनुभव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्णयाचं लक्ष्मण हाके यांनी स्वागत केलंय. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मात्र, जातीनुसार जनगणना झाली पाहिजे, असं भाजपा आणि काँग्रेस पक्षाचंही मत आहे. यापूर्वी या दोन्ही पक्षांनी आपल्या वचननाम्यात हे स्पष्ट केलं. मात्र, योग्यवेळी जातनिहाय जनगणना करणं ते टाळतात. सध्याच्या परिस्थितीत जातनिहाय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे. जातनिहाय जनगणना करताना फक्त 'हेडकाउंट' करून उपयोग नाही, तर त्याचा इम्पेरियल डेटा जमा करण सुद्धा महत्त्वाचं आहे. फक्त तुम्ही 'हेडकाउंट' करणार असणार तर पुढे काय? जोपर्यंत सरकार सामाजिक न्यायाचं धोरण बनवत नाही, त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करत नाही, तोपर्यंत जातनिहाय जनगणना करूनही उपयोग होणार नाही.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा : "जातनिहाय जनगणनेच्या घोषणा केवळ मतं, सत्ता आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या जातात. जनगणना अधिनियम 1948 मध्ये बदल झाल्याशिवाय जातनिहाय जनगणना होणार नाही. त्यामुळं विरोधात असताना जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करतात, मात्र सत्तेत आल्यावर घोषणा विसरतात," असंही लक्ष्मण हाके यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.