लातूर NEET Paper Leak Case :नीट पेपर फुटी प्रकरणाचा लातूरतील गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा वर्ग होताच मागील दोन दिवसापासून लातूरात ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्यातील आरोपी आणि कागदपत्रांचा ताबा मिळावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. न्यायालयानं सीबीआयची ही विनंती सोमवारी मान्य केली आहे. सीबीआयचे तपास अधिकारी अटकेतील आरोपी संजय जाधव व जलील पठाण या दोघांना आज (2जुलै) लातूरच्या न्यायालयात हजर करणार आहेत. सीबीआयचे अधिकारी आरोपी इरान्ना कोंगुलवार याच्या लातूरातील घराची झडती घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
दिल्लीहून लातूरमध्ये आलेले सीबीआयचे अधिकारी शनिवारी मध्यरात्री लातूरमध्ये दाखल झाले. लातूरत दोन दिवस ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या पथकानं नीट पेपर फुटी प्रकरणातील सुरू असलेल्या घटनाक्रमाची सखोल माहिती लातूर पोलिसांकडून घेतली. लातूरचे आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांना ताब्यात घेणं किती महत्त्वाचं आहे, हे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं आहे. सीबीआयच्या वतीनं विशेष सरकारी वकील मंगेश महिंद्रकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांची पोलीस कोठडी आज (2 जुलै) संपत असल्यानं त्यांना सीबीआयचे अधिकारी आज त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर करणार आहेत.