विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) Rising Sea Levels In Visakhapatnam : सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड पॉलिसीने (सीएसटीईपी) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की, समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे 2040 पर्यंत विशाखापट्टणमचा सुमारे 1 ते 5 टक्के भाग पाण्याखाली जाऊ शकतो. या अभ्यासानुसार, पुढे जाणाऱ्या समुद्रामुळे होणाऱ्या धूपमुळे किनारपट्टीवरील सुमारे 6.96-7.43 चौरस किलोमीटर वाळूचे ढिगारे नष्ट होण्याची शक्यता आहे.
'हे' समुद्रकिनारे असुरक्षित :आकडेवारीनुसार, 1992 ते 2021 दरम्यान समुद्राची पातळी सतत वाढत आहे. ही समुद्राची पातळी 20 वर्षांत 0.181 सेंटीमीटर पासून 2.38 सेंटीमीटरपर्यंत वाढली आहे. याचा अर्थ शहराचा एक-दोन टक्के किंवा सुमारे 7 चौरस किलोमीटरचा भाग पाण्याखाली जाऊ शकतो. दुसरीकडं कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणाची टक्केवारी लक्षणीय वाढली तर 2100 पर्यंत 61.58 चौरस किलोमीटरचे नुकसान होईल. CSTEP या बंगळुरूस्थित थिंक टँकनं 15 भारतीय किनारपट्टीवरील शहरांचा अभ्यास केला. या अभ्यासानुसार समुद्राजवळील विशाखापट्टणम बंदर, टेनेटी पार्क आणि रुशीकोंडा आणि मंगमरीपेटा समुद्रकिनारे विशेषत: असुरक्षित आहेत.
तर 'ही' क्षेत्र पाण्याखाली जाईल : 2040 पर्यंत मुंबई, यानम आणि थुथुकुडीमध्ये जमीन कमी होण्याचं प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त होईल. हे प्रमाण पणजी आणि चेन्नईमध्ये 5-10 टक्के आणि कोची, मंगलोर, विशाखापट्टणम, हल्दिया, उडुपी, पारादीप आणि पुरीमध्ये 1-5 टक्के राहण्याची शक्यता आहे. उच्च कार्बन उत्सर्जनाचादेखील फटका बसणार आहे. मुं बई आणि चेन्नईच्या तुलनेत मंगळूर, हल्दिया, पारादीप, थुथुकुडी आणि यानममध्ये ही टक्केवारी 2100 पर्यंत जास्त असेल. या अभ्यास प्रकल्पात वापरलेले हवामान मॉडेलनुसार समुद्र पातळीत वाढ (SLR) हे शतकाच्या अखेरीपर्यंत चालू राहणार आहे.
जलस्तर वाढण्याची कारणे : जागतिक तापमानवाढीमुळे वितळलेले बर्फ हे समुद्राची पातळी वाढण्याचं मुख्य कारण आहे. दुसरे कारण म्हणजे, विशाखापट्टणमच्या काठावर वसलेल्या टेकड्या समुद्रात बुडाल्या असल्या तरी येराडा टेकड्यांमुळे वाळूच्या नैसर्गिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सागरी अभ्यास विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ केएसआर मूर्ती यांनी सांगितले की, "यारडा टेकडीच्या पलीकडे असलेल्या आरके बीच आणि कुरुसुरा पाणबुडी संग्रहालयात यामुळे अधिक धूप होईल."