मुंबई Sharad Pawar letter : राज्यातील राज्यसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सध्या आंदोलन सुरू असून या विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा केव्हा होतील याबाबत विद्यार्थी वाट पाहात असून विद्यार्थ्यांना त्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात लवकरात लवकर स्पष्टता करावी यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसंच यासंदर्भात आपली भेट मिळावी यासाठी वारंवार प्रयत्न करूनही भेट मिळत नाही असंही पवार यांनी नमूद केलं आहे.
पवारांनी काय म्हटले आहे पत्रात - या संदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, राज्यात 32 लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अहोरात्र अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया वेळेवर व्हावी त्यांना नियुक्त्या मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र सद्यस्थितीत रखडलेल्या नियुक्त्या आणि अनेक परीक्षांच्या प्रलंबित असलेल्या जाहिराती परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यास होत असलेला उशीर यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्यांच्यामध्ये असंतोष आहे. ऑगस्ट 2024 मध्ये नियोजित असलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या दिवशी आयबीपीएस परीक्षा येत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी तसेच राज्यसेवेच्या परीक्षेत कृषीच्या 258 जागांचा समावेश करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. परंतु परीक्षा पुढे ढकलत असताना ती कधी घेता येईल याबाबतची नेमकी माहिती आधी कृषी सेवेच्या जागांबाबत स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले नाही. तीन आठवडे उलटूनही आयोगाने परीक्षेची तारीख घोषित केलेली नाही. संदर्भात देखील निर्णय घेतलेला नाही. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने याबाबत निर्णय घेण्यात यावा असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. राज्यसेवा कृषी सेवा पोलीस निरीक्षक विक्रीकर सहाय्यक इत्यादी सरळ सेवेतील अनेक पदांवर निवड होऊनही बराच कालावधी उलटला तरी पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळालेल्या नाहीत. रखडलेल्या नियुक्तींचा आढावा घेऊन पात्र विद्यार्थ्यांना त्वरित नियुक्त्या द्याव्यात तसेच लिपिक पदाकरिता 7000 हून अधिक जागांची भरती यासह काही अन्य भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणात अडकल्या आहेत. त्याबाबतही त्वरित निर्णय घेण्यात यावा. राज्यात शिक्षण तसेच प्राध्यापकांच्या देखील अनेक जागा रिक्त असल्याने रिक्त जागांचा नव्याने आढावा घेऊन शिक्षक भरती तसेच प्राध्यापक भरतीला देखील गती द्यावी असे पवारांनी या पत्रात म्हटले आहे.
प्रश्नांची तड लावण्यासाठी वेळ द्या - राज्यभरातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपली वेळ मिळावी यासाठी आपण सातत्याने काही दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. मात्र अद्यापही आपली वेळ मिळालेली नाही, असे नमूद करत पवार यांनी या पत्रात म्हटले आहे की, वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून त्यांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने कार्यवाही होत नसल्याने हा विषय संवेदनशील झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात बैठक आयोजित करावी, असेही पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा..