नाशिक Deepak Badgujar : नाशिकच्या सिडको 2022 मध्ये रिपाईंचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सराईत गुन्हेगार मयूर बेदला पुण्याहून अटक केल्यानंतर, पोलीस तपासात दीपक बडगुजर याचं नाव समोर आलं. संशयित अंकुश शेवाळे याने दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून मयूर बेदला गोळीबार करण्यासाठी दोन लाख रुपये दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. यानंतर अंबड पोलिसांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान दीपक बडगुजर गेल्या काही दिवसांपासून परदेशात असल्याचं समजतय.
काय आहे प्रकरण : कोरोना काळात रिपाईंचे पदाधिकारी प्रशांत जाधव आणि संशयित अंकुश शेवाळे आणि दीपक बडगुजर यांच्यात त्रिमूर्ती चौक परिसरात वाद झाला होता. यानंतर दीपक बडगुजरने अंकुश शेवाळेच्या माध्यमातून सराईत गुन्हेगार मयूर बेदला जाधव यांच्यावर गोळीबार करून धमकवण्यासाठी दोन लाखांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
सर्व आरोपींना अटक होणार : दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याची उकल होत असून तपासात निष्पन्न होणाऱ्या आरोपींना अटक होत आहे. गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन पोलीस तपास करत आहेत. सर्व आरोपींना अटक करून गोळीबारामागील सत्य पोलीस समोर आणणार असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे.
खोट्या गुन्ह्यांविरोधात आंदोलन करू : राज्यकर्ते आणि पोलीस यंत्रणा कारस्थान रचत असून तडीपारीच्या नोटीसा पाठवत आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रकार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला लक्षणीय यश मिळाले. त्यामुळं सत्ताधारी सैरभैर झाले असून खोटे गुन्हे दाखल करण्याचं कारस्थान करत आहेत. त्यांचा हा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही. या कारवाईच्या निषेधार्थ शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र धरणे आंदोलन छेडले जाईल असा इशारा, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिला.
हेही वाचा -