मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तळागाळातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळू लागले. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील गरजू व पात्र महिलांसाठी राबवण्यात येते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या योजनेचा लाभ चक्क बांगलादेशी महिलेनं घेतल्याचं समोर आलं आहे.
मुंबईतील कामाठीपुरा इथं राहणाऱ्या बांगलादेशी महिलेनं बनावट कागदपत्रं सादर करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याच्या आरोपावरून तिला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली. सध्या या महिलेची चौकशी सुरू असून या योजनेचा लाभ तिने कसा घेतला, त्यासाठी कोणती बनावट कागदपत्रं सादर केली, भारतात वास्तव्य करत असताना त्यांच्याकडे कोणती अधिकृत कागदपत्रं आहेत? की ते चुकीच्या पद्धतीनं भारतात राहत आहेत, त्याबाबतचा तपास गुन्हे शाखा करत आहे.
याप्रकरणी तीन बांगलादेशी महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका दलालाला देखील अटक करण्यात आली आहे. या दलालानं बनावट कागदपत्रं बनवण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. बांगलादेशातून अवैधरित्या भारतात येऊन बेकायदा पद्धतीनं राहण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आला.