मुंबई :सोमवार 9 डिसेंबर हा मुंबईकरांच्या विशेषता कुर्लावासीयांच्या आयुष्यातील काळा दिवस गणला जाईल. नऊ डिसेंबर रोजी बेस्ट बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. तर, 49 जण जखमी झाले. या घटनेची सध्या चौकशी सुरू असून, दोष कुणाचा होता हे लवकरच समोर येईल. मात्र, आता या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओत एक हेल्मेट घातलेला व्यक्ती मृत महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या चोरी करत असल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला असून, माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य या व्हिडिओ दिसत आहे.
सोन्याच्या बांगड्या घेतल्या काढून :कन्नीस अन्सारी ही 55 वर्षीय महिला कुर्ला इथल्या बेस्ट अपघातात मृत झाली. या महिलेच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. त्याचवेळी तिथं निळ्या कलरचं हेल्मेट घातलेला एक व्यक्ती आणि त्याचा सहकारी असे दोघं जण आले. या दोघांनी सदर मृत महिलेच्या हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. त्याचवेळी तिथं बाचावकार्यासाठी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.