नागपूर Kunal Raut Arrested :कॉंग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र तथा युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी अटक केलीय. कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन 'मोदी की गॅरंटी' अशा आशयाच्या पोस्टर्सवर काळं फासत मोदी या शब्दावर भारत असं स्टिकर लावून पोस्टर्सवर खोडतोड केली होती. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केलीय. यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
नोटीस बजावल्यानंतर राऊत होते बेपत्ता : शनिवारी घडलेल्या या प्रकरणानंतर नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना नोटीस बजावत पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच बेपत्ता होते. यानंतर नागपूर शहरापासून 40 किमी लांब असलेल्या कुही या ठिकाणाहून नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना ताब्यात घेतलं असून त्यांना अटक करण्यात आलीय.
पंतप्रधान मोदींच्या फोटोला फासलं काळं : पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतःची प्रसिद्धी करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं शनिवारी आंदोलन केलं होतं. या आदोलनादरम्यान त्यांनी नागपूरात जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले होते. तसंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळंही फासलं. या आंदोलनामुळं नागपूर जिल्हा परिषदेत काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
सरकारच्या निषेधार्थ आंदोलन : भारत सरकारव्दारे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी या उद्देशानं योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात येतात. मात्र यातून नागरिकांची दिशाभूल करत शासकीय आवारात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपली स्वतःची प्रसिद्धी करत असून केवळ स्वत:च्या प्रचार-प्रसारासाठी सर्वसामन्यांच्या पैशांची उधळपट्टी केली जातेय. त्यामुळं या निष्फळ गोष्टीवर जनतेचा पैसा खर्च करणाऱ्या या सरकारचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत असल्याचं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी म्हटलंय.
हेही वाचा :
- "काळे गुलाब" देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस करणार पंतप्रधानांचे स्वागत, 'हे' आहे कारण
- Youth Half-Naked Protest in Nagpur : युवक काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन... नरेंद्र मोंदीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी