कोल्हापूर Koyna Express Accident News : मुंबईतून कोल्हापुरात येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसनं तीन महिलांना चिरडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत दोन महिला आणि एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. तर रुळावरुन चालत येत असताना ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं ही दुर्घटना अपघात की आत्महत्या याबाबत शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीला दिली आहे.
नेमकं काय घडलं? : मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस कोल्हापुरातील मार्केट यार्डपासून पुढं छत्रपती शाहू महाराज रेल्वेस्थानकडं येत असताना कोयना एक्स्प्रेसची तिघींना जोराची धडक बसली. या धडकेत एक महिला रुळाच्या एका बाजूला तर दुसरी महिला आणि मुलगी रेल्वे रुळाच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या. तिघींच्या अंगावरुन रेल्वेचं चाक गेल्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत्यू झालेल्यांपैकी एक महिला 40 ते 45 तर दुसरी महिला 25 ते 30 वयोगटातील आहे. तर त्यांच्यासोबत असणारी लहान मुलगी दहा ते बारा वर्षांची असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. रुळावर धडक बसताच लोको पायलटनं रेल्वेचा वेग कमी करत ती काही अंतरावर थांबवली. रेल्वे अचानक थांबल्यानं परिसरातील नागरिकही रुळाच्या दिशेनं आले. यावेळी तिघींचे मृतदेह आढळून आले. लोको पायलटनं ही माहिती रेल्वेगार्डला तर रेल्वेगार्डनं ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी शाहूपुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.