महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात महाविकास आघाडी भक्कम, विद्यमान खासदार संजय मंडलिक महायुतीला तारणार का? - Kolhapur Lok Sabha

प्रामुख्याने पाहिलं तर कोल्हापूर हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्या भागात भाजपा, शिवसेनेला आणखी तितका शिरकाव करता आलेला नाही. त्यातच सध्या राजकीय परिस्थिती फारच वेगळी आहे. शिसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची शकलं उडाली आहेत. त्याच वातावरणात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर लोकसभेला कुणाच्या अंगावर गुलाल उधळतात, हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.

श्रीमंत शाहू महाराज आणि खासदार संजय मंडलिक
श्रीमंत शाहू महाराज आणि खासदार संजय मंडलिक

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 8:48 PM IST

कोल्हापूर : Kolhapur Lok Sabha : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत होईल अशी परिस्थिती आहे. राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघ असलेल्या कोल्हापुरात इंडिया आघाडीचा भाग असलेल्या महाविकास आघाडीकडं तगडा उमेदवार असल्यामुळे त्यांची बाजू सध्यातरी भक्कम झाल्याचं दिसत आहे. तर, महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. मात्र, राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय मंडलिक महायुतीला तारणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कोल्हापूरच्या जागेसाठी दावे-प्रतिदावे :कोल्हापूर लोकसभा जागेचा पूर्व इतिहास पाहता कोणत्याही राजकीय पक्षानं दिलेला उमेदवार कोल्हापूरकरांच्या पसंतीस उतरल्यानंतरच त्याला मतपेटीतून भरभरून मताचं दान मिळतं. (2009, 2014 आणि 2019) या वर्षांच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवाराची पारख करताना वेळोवेळी कोल्हापूरचा स्वाभिमान मतपेटीतून मतदारांनी दाखवून दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने, दूध संस्था, विकास सेवा सोसायटी, सहकारी बँका यांच्या माध्यमातून सहकाराचं जाळं भक्कम आहे. सलग चारवेळा कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलेल्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांना (2009)च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उमेदवारीसाठी डावलण्यात आलं. तेव्हा कोल्हापूरचा स्वाभिमान काय असतो, याची प्रचिती माजी मुख्यमंत्री शरद पवारांनाही आली आहे. या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांची ही शेवटची निवडणूक ठरली. मात्र, त्यानंतर मंडलिक या नावाला असलेला जनाधार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आला.

उमेदवार कोण हे गुलदस्त्यात : तेव्हाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा संजय मंडलिक यांनी सुमारे पावणे तीन लाखांच्या मतानं पराभव केला होता. मात्र, गेल्या पाच वर्षात कोणतेही भरीव काम सध्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात असलेले खासदार संजय मंडलिक यांच्याकडून झालं नाही. याबरोबरच मतदार संघातील औद्योगिक वसाहत, कोल्हापूर रेल्वेचे प्रश्न, राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित होणाऱ्या जमीनधारक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून कोल्हापूरच्या जागेवर दावा सांगण्यात येत आहे. मात्र, कोल्हापूर लोकसभा निवडणूक नेमका कोणता पक्ष लढणार आणि उमेदवार कोण असणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

काँग्रेसची वाढलेली ताकद मविआसाठी फलदायी : काँग्रेस हा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात ताकदवान पक्ष आहे, असं म्हणत कोल्हापूर लोकसभा आम्हीच लढवणार असा काँग्रेसमधील नेत्यांचा सूर आहे. काँग्रेसचे पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, जयश्री जाधव हे विधानसभेचे तर आमदार सतेज पाटील, जयंत आसगांवकर हे विधान परिषदेचे आमदार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणाचा आर्थिक सत्ता केंद्र असलेला गोकुळ दुध संघ सध्या आमदार सतेज पाटील यांच्या ताब्यात आहे. तर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये असलेली एकसंघता कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी मुख्य दावेदार म्हणून पुढे आणत आहे. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रापैकी कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर शहर आणि करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्यामुळे काँग्रेस पक्षाला कोल्हापूर लोकसभेचे तिकीट मिळाल्यास आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेस विजयी होण्याची शक्यता अधिक आहे. तर, मविआमधील शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मनी आणि मसल पॉवर असलेला उमेदवार शोधण्याची स्पर्धा लागली आहे.

महायुतीत नेत्यांची भाऊ गर्दी : राज्यातील सत्ता समीकरणं बदलल्यानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून महायुती आकाराला आली. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना सोडचिट्टी देऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गेलेले राज्य मंत्रिमंडळातील वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजपा नेते समरजीत घाटगे या नेत्यांची ताकद महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पणाला लागणार आहे. मात्र, महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळणार असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच राष्ट्रीय अधिवेशनात स्पष्ट केलं आहे. मात्र, पक्षाचा आदेश आल्यास राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनीही आपण लोकसभा लढवू, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे महायुतीकडून नेमका उमेदवार कोण असणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. उमेदवारीच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीनं सरशी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शरद पवारांकडून कोल्हापुरात चाचपणी :महाविकास आघाडीतील प्रमुख नेते खासदार शरद पवारांनी नुकताच कोल्हापूरचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांची नवीन राजवाडा या ठिकाणी जाऊन भेट घेतली. श्रीमंत शाहू महाराजांसारखा पुरोगामी चेहरा कोल्हापुरात देण्यासाठीच पवारांनी थेट राजवाडा गाठून चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते सतेज पाटील यांची शरद पवारांच्या दौऱ्यात डिनर डिप्लोमसी पाहायला मिळाली. आमदार पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. यातूनच आमदार पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा जागा काँग्रेससाठी किती महत्त्वाची आहे, हेच अधोरेखित केलं.

उमेदवार कोण? :राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी एकोणचाळीस जागांबाबत महाविकास आघाडीचं एकमत झालं आहे. उर्वरित नऊ जागांवर लवकरच निर्णय होईल अशी माहिती आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभेची जागाही समाविष्ट आहे. महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज, उबाठा गटाचे संपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी पाटील, कागलचे माजी आमदार संजय घाटगे, बाजीराव खाडे हे महायुतीकडून दावेदार मानले जात आहेत. तर, आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी खेचून आणल्यास काँग्रेसचे निष्ठावंत आमदार पी.एन.पाटील किंवा स्वतः आमदार सतेज पाटील लोकसभेच्या मैदानात असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून अजूनही विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. मात्र, लोकांमधील त्यांच्याबाबत होणारी नकारार्थी चर्चा ऐनवेळी उमेदवार बदलवू शकते. असंही राजकीय जाणकार सांगत आहेत. यामुळे महाविकास आघाडीकडून मंडलिक यांना पर्याय म्हणून राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, समरजीत घाटगे यांचीही नावे चर्चेत आहे.

कोल्हापूरचे जावई यंदा तरी सासुरवाडीत कमळ फुलवणार का? :भाजपाचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूरचे जावई आहेत. केंद्रात गेल्या दहा वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. मात्र, 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकांमध्ये जंग पछाडूनही भारतीय जनता पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही लोकसभा जागांवर कमळ चिन्हावर निवडून येणारा प्रबळ उमेदवार अजूनही सापडलेला नाही. संसद प्रवास योजनेच्या माध्यमातून डझनभर केंद्रीय मंत्री कोल्हापुरात आले. मात्र, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा क्षेत्रात सद्यस्थितीलाही भाजपाची पाळीमुळे घट्ट झालेली नाहीत. यामुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तरी कोल्हापूरचे जावई गृहमंत्री अमित शाहा कोल्हापुरात कमळ फुलवणार का? असा प्रश्नही कोल्हापूरकर उपस्थित करत आहेत.

अंतिम प्रारूप मतदार यादीनुसार मतदार संख्या :कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, राधानगरी, चंदगड या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. सद्यस्थितीत यातील कोल्हापूर शहर कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघ महामहाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. तर, कागल राधानगरी आणि चंदगड मतदारसंघ महायुतीच्याच्या बाजूने आहेत.

2009 ला लेकाचा पराभव, 2024 मध्ये पिता उमेदवार? : 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केलेलं एक वक्तव्य कोल्हापूरकरांच्या जिव्हारी लागलं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा नूरच पालटला. शरद पवारांनी तेव्हाचे लोकसभा उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांना उद्देशून म्हातारा बैल अशी टीका केली होती. या टीकेला कोल्हापूरकरांनी मतपेटीतून उत्तर दिलं. अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांचा विजय झाला. या लढतीत राजघराण्यातील सदस्य संभाजी राजेंचा पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक यांच्या विरोधात संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुलाच्या झालेल्या पराभवाचा बदला श्रीमंत शाहू महाराज घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा :

1शरद पवार यांनी 'तुतारी' हे चिन्ह विरोधकांना वाजवण्यासाठी घेतलं असावं- वडेट्टीवार

2"तुतारी कायमच आणि चांगल्या वेळी वाजत असते", श्रीमंत शाहू महाराजांनी काय दिले संकेत?

3शेतकरी आंदोलन आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, पंजाबच्या सीमेवर तणावाची स्थिती

ABOUT THE AUTHOR

...view details