अमरावती Jain Temples Amravati :अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर अशी ओळख असणाऱ्या अचलपूरमध्ये साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं 'दिगंबर जैन मंदिरा'ला अचलपूरच्या वैभवात मोठा मान आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी युरोप देशामधून आणलेल्या टाइल्स, झुंबर आदी वस्तूंनी हे मंदिर सजवण्यात आलं आहे. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर भव्य दिव्य अशा महालात आपण आलो की काय असा भास या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला होतो.
ईलीचपुर होतं जैन धर्मियांचे प्रमुख केंद्र :हजारो वर्षांपूर्वी 'ईलीजपूर' म्हणजे आजचे 'अचलपूर' हे जैन धर्मियांचे प्रमुख केंद्र होतं. ईलीच राजाच्या काळात या इलीजपूरमध्ये एकूण बावनपुरे अर्थात 52 पेठा होत्या. आज देखील हे बावनपुरे अचलपूरमध्ये कायम आहेत. पूर्वी या सर्व बावनपुऱ्यांमध्ये जैन मंदिर होती. इ.स 1020 ते 1030 दरम्यान अफगाणिस्तानातून भारतात मुस्लिम आक्रमणाच्या काळात ईचलपूर येथील बावनपुऱ्यांमध्ये असलेल्या जैन मंदिरातील शंभर ते दीडशे सुंदर अशा जैन मुर्त्या जैन धर्मियांची काशी अशी ओळख असणाऱ्या मुक्तागिरीच्या पहाडावरील जैन मंदिरांमध्ये हलविण्यात आल्या.
सुलतानपूर येथील जैन मंदिराचा असा आहे इतिहास : सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी राजस्थानमधील बघेर या ठिकाणावरून अनेक जैन धर्मीय बांधव विदर्भात आलेत. यापैकी अनेक जैन धर्मीय बांधव हे जैन धर्मियांचे मुख्य केंद्र असणाऱ्या ठिकाणांपैकी एक अशा अचलपूर येथे स्थायिक झालेत. राजस्थानमधून येताना जैन धर्मीय बांधवांनी उंटांवरून त्यांच्याकडील अनेक साहित्य अचलपूरला आणलेत. त्यामध्ये तीर्थंकरांच्या मूर्ती देखील होत्या. या जैन बांधवांमध्ये अतुल कळमकर यांचं कुटुंब देखील अचलपूरला आलं. "जैन धर्मियांमध्ये देवाचं दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण केलं जात नाही. यामुळे लालसा नोतीसा यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सुलतानपुरा परिसरात या दिगंबर जैन मंदिराची स्थापना केली. हे कळमकर कुटुंबीयांचं वैयक्तिक मंदिर आहे," अशी माहिती अतुल कळमकर यांच्यासह या मंदिराची संपूर्ण व्यवस्था पाहणारे विलास कस्तुरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.