महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत ‘मिनी बांगलादेश’? किती लोकांना मिळाला जन्माचा दाखला? किरीट सोमैयांच्या दाव्यानं खळबळ - KIRIT SOMAIYA ON BANGLADESHI

भिवंडीत एक हजाराहून अधिक तर राज्यात दोन लाख बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केलाय.

Kirit Somaiya claims more than one thousand Bangladeshi in Bhiwandi and two lakh Bangladeshi citizens in state
किरीट सोमैया (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2025, 3:40 PM IST

ठाणे : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चोरी करणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातून पकडण्यात पोलिसांना यश आलय. अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केल्यानं बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाई तीव्र करण्याची मागणी वाढीस लागली आहे. याच प्रकरणावरुन भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) आक्रमक झाल्याचं बघायला मिळतय.

नेमकं काय म्हणाले किरीट सोमैया? :मालेगाव येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना बनावट जन्मदाखले देऊन त्यांना आधारकार्ड देऊन त्यांचा समावेश मतदार यादीत केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. त्यानंतर राज्यसरकारनं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची घोषणा केली होती. आता भिवंडीत देखील मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याचा दावा किरीट सोमैयांनी केलाय. "भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात एक हजाराहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज दिलेत. यापैकी शेकडो बांगलादेशी नागरिकांना स्थानिक तहसील आणि काही ग्रामपंचायतीच्या वतीनं जन्म दाखला देण्यात आलाय. राज्यात दोन लाख बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत", अशी माहिती सोमैया यांनी दिलीय. तर बांगलादेशी नागरिकांना पुरावा म्हणून ग्रामपंचायती तर्फे देण्यात आलेल्या जन्म दाखल्यांची संपूर्ण चौकशी करुन, दोषी अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

किरीट सोमैया यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

तहसीलदाराची घेतली भेट : किरीट सोमैया यांनी आज (23 जाने.) भिवंडी तहसीलदार कार्यालयात येऊन तहसीलदारांची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी उशिरा जन्म दाखला घेणाऱ्या नागरिकांच्या नोंदींची तपासणी केली. यामध्ये भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात एक हजाराहून अधिक बांगलादेशी नागरिकांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज दिल्याचं समोर आलं. यात प्रामुख्यानं मुस्लिम वस्त्या असलेल्या खोणी महापोली आणि पडघा-बोरीवली या ग्रामपंचायतीतील अधिकाऱ्यांनी शेकडो बांगलादेशी नागरिकांना जन्म दाखले दिलेत, असा दावाही किरीट सोमैया यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधात कारवाई तीव्र करा, किरीट सोमैया आणि चित्रा वाघ यांची मागणी
  2. बांगलादेशी रोहिंग्यांचा अंजनगावशी संबंध नाही; किरीट सोमैया यांच्या आरोपावर तहसीलदारांचं स्पष्टीकरण
  3. मालाड पश्चिम मधील कॉंग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांच्या शैक्षणिक पात्रतेवर किरीट सोमैया यांचं प्रश्नचिन्ह

ABOUT THE AUTHOR

...view details