छत्रपती संभाजीनगर :राज्यातील बांगलादेशी घुसखोरांबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कडाडून टीका केली. उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार उपजिल्हाधिकारी यांच्याकडं देण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी खूप मोठा गोंधळ उडाला. जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात अचानक इतक्या जणांना प्रमाणपत्र कसं देण्यात आलं, असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलाय. जे काही प्रमाणपत्र दिलेत त्याची पुनर्तपासणी होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगानंच आपण मागणी केल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांनी सोमवारी सिल्लोड मतदारसंघात जाऊन आढावा घेतला.
सिल्लोडमध्ये सर्वाधिक अर्ज कसे :2024 या वर्षांमध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडं देण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात काही शहरांमध्ये गोंधळ झाला आहे, हे आपल्या लक्षात आलं. "महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी बांगलादेशी नागरिकांचे दोन लाख अर्ज आले आहेत. त्यापैकी एक सिल्लोड आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहराचा देखील समावेश यात असून एकूण 10 हजार 68 अर्ज जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यात नऊ तालुके आहेत आणि शहरं देखील या जिल्ह्यात आहेत. आलेल्या अर्जात 4730 अर्ज फक्त एकट्या सिल्लोडचे आहेत. यातील 98 टक्के अर्ज बांगलादेशी पार्श्वभूमी असलेल्या मुस्लीम नागरिकांचे आहेत. त्यामुळे चौकशी व्हायला हवी," अशी मागणी केल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.