ठाणे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध वडापाव (Maharashtra Famous Vada Pav) अनेकांचं पोट भरतो. काहींचा तर सकाळचा नाश्ता ते रात्रीचं जेवण हा 'वडापाव'च असतो. त्यातही मुंबई आणि मुंबईचा वडापाव यांचं नातं खास आहे. मुंबईत आल्यावर वडापाव (Vada Pav) ट्राय नाही केला असं होतच नाही. बटाट्याची भाजी अन् बेसन पिठापासून तयार केलेल्या या वडापावची जागा आता वेगवेगळ्या चवीच्या आणि फ्लेवरच्या वडापावनं देखील घेतलीय. चीज वडापाव, तंदुरी वडापाव, मंच्युरियन वडापाव, ग्रील वडापाव, जम्बो वडापाव असे अनेक वडापावचे प्रकार खवय्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. अशाच या मराठमोळ्या वडापावची भुरळ आता सातासमुद्रापार असलेल्या नागरिकांनाही पडल्याचं बघायला मिळतंय.
ठाण्यातील वडापाव पोहोचला परदेशात : दादर स्टेशनपासून सुरू झालेल्या वडापावनं जागतिक पातळीवर आपलं विशेष स्थान निर्माण केलंय. या संदर्भात ठाण्यातील पाचपाखाडी येथील गेल्या ३० वर्षांपासून या व्यवसायात यशस्वी ठरलेल्या म्हात्रे यांच्या कुटुंबीयांशी बातचीत केली असता, त्यांच्या वडापावची मागणी अमेरिका, जपान, दुबई, ऑस्ट्रेलिया, लंडन अशा दूरदेशा पसरलेल्या महाराष्ट्रीयन लोकांच्याकडून असल्याची माहिती त्यांनी दिली.
२४ तासानंतरही चव जशीच्या तशीच : "विविध देशातील नागरिकांना वडापाव देण्यापूर्वी तो वडापाव गरमा-गरम तयार करुन त्याला थंड केलं जातं. त्यानंतर फॉईल पेपरमध्ये रॅप करुन तो वडापाव पार्सल करुन दिला जातो. घरी गेल्यानंतरही रॅपमधून बांधून नेलेले वडे तसेच ताजे राहतात. त्यामुळं रॅपमधून काढून तो वडापाव गरमा गरम खाऊ शकतो. ठाण्याहून निघताना वडापावची असलेली चव २४ तासानंतरही जशीच्या तशीच असते," असंही म्हात्रे कुटुंबीयांनी सांगितलं.
चटणी आणि पॅकिंग महत्वाचे : वडापाव व्यवसायात वड्यासोबत तुम्ही ग्राहकांना काय विशेष देता हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आम्ही तीन वेगवेगळ्या चटणी आणि दूर जाणाऱ्या पार्सलचे विशेष पॅकिंग करतो आणि हेच ग्राहकांच्या आकर्षणाचं केंद्र असल्याचंही म्हात्रे सांगतात.
हेही वाचा -
- वडाच नाही तर मुंबईकरांचं पोट भरणारा पावही महागला; महागाईने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री
- 'मुंबईचा वडापाव' जगात भारी; खवय्यांना कुठे मिळतील बेस्ट वडापाव? - World Vada Pav Day 2024
- गरीबांसह श्रीमंतांची पसंती असलेल्या वडापावचा शोध कोणी लावला? जागतिक वडापाव दिनानिमित्त वाचा खास माहिती - World Vada Pav Day