शिर्डी : 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या गजरात वाकडी इथल्या खंडेराय महाराज मंदिरात एक हजार नागरिकांनी जागरण गोंधळ घातला. राज्यातील हजाराच्या वर नागरिकांनी वाकडीत एकाच वेळी जागरण गोंधळ घातल्यानं वातावरण भक्तिमय झालं. अहिल्यानगर जिल्ह्याची प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबाची वाकडी इथं रामनाथ बाबा कोते ( भगत ) यांच्या पुढाकारानं सुरु झालेला खंडेरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा वर्धापन दिन सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी राज्यातील अनेक नामवंत वाघ्यांनी हजेरी लावली.
जागरण गोंधळ घालताना भाविक (Reporter) भाऊबीजेच्या दिवशी रंगला सोहळा :भाऊबीजेच्या दिवशी पहाटे काकड आरती, भजनानंतर खंडोबा देवाला अभिषेक घातल्यानंतर "येळकोट येळकोट जय मल्हार"चा जयघोष करण्यात आला. यावेळी कोटमा भरून दत्तात्रय कोते यांच्या हस्ते भंडारा उधळण करून जागरण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. वाकडी पंचक्रोशीसह अहिल्यानगर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील खंडोबाचे 1000 च्या वर नागरिकांच्या जोडीनं घट मांडून जागरण गोंधळ घालण्यात आला. या शिवाय या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील नामवंत गायक, वाघे मंडळींनी हजेरी लावली. यावेळी शेकडो वाघे मंडळींचे ताफे आले.
येळकोट येळकोट जय मल्हार ; तब्बल एक हजार जोडप्यांनी घातला खंडोबाचा जागरण गोंधळ (Reporter) तुणतुण्यावर रंगली खंडोबाची गाणी :सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. या दरम्यान राज्यातील अनेक वाघे मंडळींनी आपली हजेरी लावली. या कालावधीत प्रत्येक ताफ्यानं 2- 2 खंडोबाची गाणी गायली. तब्बल 6 तास खंजिरी, तुणतुणं, डफ यांच्या निनादासह खंडेरायाची स्तुती करणारी गाणी सादर करण्यात आली. घरगुती जागरण गोंधळ करण्यासाठी पाच ते दहा हजाराचा खर्च येतो. मात्र वाकडीत या सामूदायिक जागरण गोंधळ कार्यक्रमात केवळ 251 रुपयात भव्य असा जागरणाचा कार्यक्रम होत असल्यानं प्रतिवर्षी या ठिकाणी जागरण गोंधळ करण्यासाठी भाविकांची संख्या वाढताना दिसून येत आहे.
जागरण गोंधळ घालताना भाविक (Reporter) रामनाथ बाबा कोते यांनी केली सुरुवात :रामनाथ बाबा कोते यांनी सन 1991 साली वाकडी खंडोबाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. त्यावेळी 11 जोड्या जागरण गोंधळात सहभागी झाल्या. हळू हळू ही संख्या वाढत जाऊन आज एक हजारपेक्षा अधिक जोड्या या जागरण गोंधळात सहभागी झाल्या आहेत. घरात सुख शांती, राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होण्यासाठी भाविकांनी खंडोबा चरणी प्रार्थना केलीय.
जागरण गोंधळ घालताना भाविक (Reporter) हेही वाचा :
- भंडारा उधळत माउलींचा जयघोष, जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा प्रवेश; पाहा ड्रोन व्हिडिओ - Dnyaneshwar Maharaj Palkhi
- शिर्डीत साई परिक्रमा सोहळा; हजारो साईभक्तांच्या जयघोषानं दुमदुमली साईनगरी
- ढोल ताशाच्या तालावर घोड्यांचा ठेका! देवगडच्या खंडोबा यात्रेत अनेक स्पर्धक सहभागी