अमरावती :मेळघाटातील 'लाकटू' या दुर्गम गावात कुंजीलला पटेल पटोरकार यांच्या शेतात लाल कंद मात्र बाहेरून पांढरे, आतमधून लाल तर, कधी हळदी सारख्या रंगाचे आले आहेत. मेळघाटच्या मातीत पहिल्यांदाच हा प्रयोग यशस्वी झाला. हे लाल कंद अनेक पौष्टिक घटकांनी समृद्ध असून मेळघाटातील आदिवासी महिला आणि मुलांना लाल कंद अतिशय आरोग्यदायी ठरणारे आहेत. महाशिवरात्री दिवशी उपासासाठी हे कंदमूळ अनेकांना चाखायला मिळेल. केरळचे हे लाल कंद मेळघाटच्या मातीत कसे रुजले आणि भविष्यात लाल कंदामुळं मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना कसा लाभ होईल? या संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.
मेळघाटात असे रुजले लाल कंद : अमरावती शहरालगत घातखेड कृषी विज्ञान केंद्राच्या आदिवासी उपयोजना अंतर्गत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा भाग म्हणून मेळघाटातील धारणी तालुक्यात अति दुर्गम भागात वसलेल्या लाकटू गावात लाल रंगाचा गर असणारे रताळ्याचे पीक घेण्याचा विचार करण्यात आला. विशेष म्हणजे कृषी केंद्राच्या गृह विज्ञान विषयाच्या तज्ज्ञ प्रा. डॉ. प्रणिता कडू यांच्या मार्गदर्शनाखाली लाकटू इथल्या समग्र गाव योजनेसाठी काम करणारे संतोष काछवार यांच्या माध्यमातून कुंजीलला पटेल पटोरकार यांच्या शेतात लाल कंदाच्या वेलीची पंधरा रोपं लावली. पटोरकार यांच्या शेतात आज चाळीसच्यावर लाल कंदाच्या वेली बहरल्या आहेत.
'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट (ETV Bharat Reporter) अशी केली लागवड : "लाल कंद प्रकाराची माहिती पहिल्यांदाच प्रा. डॉ. प्रणिता कडू यांनी आम्हाला सांगितली. आम्हाला त्यांनी वेलींच्या फांद्यांचे दोन फुटांचे तुकडे दिले आणि ते तुकडे शेतात कसे लावायचे हे सांगितलं." असं प्रभू पटोरकार यांनी "ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. "प्रा. डॉ . प्रणिता कडू यांच्या सांगण्यानुसार आम्ही मातीचे वाफे तयार केले. या वाफ्यांवर पाणी शिंपडून त्यावर या फांद्या लावल्या. यानंतर या फांद्यांना थोडं ऊन दिल्यावर पुन्हा थोडं पाणी दिलं. यानंतर या वेली वाढायला लागल्या. याला जास्त पाणी द्यायची गरज नाही. आज आमच्या शेतात चाळीस ते पन्नास लाल कंदाची रोपं तयार आहेत. आता महाशिवरात्रीच्या उपासाला आमच्या भागातील अनेकांना हे लाल कंद चाखायला मिळतील." असं प्रभू पटोरकार यांनी सांगितलं.
भविष्यात मोठी बाजारपेठ : लाकटू इथले रहिवाशी संतोष काछवार म्हणाले, "लाल कंद मेळघाटात यशस्वी झाले असून आता आणखी दहा शेतकरी त्याची लागवड करणार आहेत. भविष्यात लाल कंदांचं उत्पन्न वाढलं की, परिसरासह लगतच्या भागात लाल कंदाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की, या भागात अनेकांना दूध मिळत नाही. मात्र, दुधात असणारे पौष्टिक घटक आदिवासी बांधवांना या लाल कंदांतून मिळेल."
अख्खं कुटुंब शेतात :सातपुडा पर्वतरांगातील घनदाट जंगल परिसरात असणाऱ्या लाकटू गावातील कुंजीलला पटेल पटोरकार यांच्या शेतात लाल कंद पहिल्यांदा आलेत. एका वेलीमध्ये पाच ते सहा लाल कंद आलेत. या लाल कंदांसोबतच शेतात मका, गहू अशी पिकंही आहेत. शेतात जंगली डुक्कर आणि इतर प्राण्यांचा सतत त्रास होत असल्यानं शेतातील सर्वच पिकांची काळजी घेण्यासाठी पाटोरकार यांचं अख्खं कुटुंब गाव सोडून शेतात राहातं. कुंजीलाल पटोरकार हे वन विभागात वन मजूर म्हणून सेवेत आहे. शेतीचं काम त्यांचा मुलगा प्रभू पाहतो. शेतात बांधलेल्या झोपडीत सध्या पाटोरकर कुटुंबातील सासू, सून, नातवंड हे वास्तव्यास आहेत. रात्री मचाणावर बसून शेतात येणाऱ्या जनावरांवर लक्ष देणं आणि त्यांना परिसरातून पिटाळून लावण्याचं काम ते करतात. मेळघाटात शेतातील रात्रीला 'जागली' म्हणतात. शेतातील सर्व पिकांची कापणी आणि त्यांना बाजारात घेऊन जाण्याची कामं पाटोरकर कुटुंब सध्या करत आहेत.
अशी आहेत लाल कंदाची वैशिष्ट्यै : "विशेषतः कंदांसाठी काम करणाऱ्या केरळमधील त्रिवेंद्रम इथल्या कृषी संशोधन केंद्रात लाल कंदामध्ये जैव उपलब्धता अधिक व्हावी यासाठी पोषक घटकांची मात्रा वाढवण्याचा प्रयोग करण्यात आला. हे लाल कंद गरिबांच्या आहारात पोषक घटक म्हणून फायद्याचे आहेत. त्रिवेंद्रम इथल्या कृषी संशोधन केंद्रातील लाल कंदाचा हा प्रकार 'भूकांती' नावानं ओळखला जातो. भूसोना, भूकृष्णा हे देखील दोन प्रकार लाल कंदामध्ये आहेत. लाल कंद मेळघाटात लाकटू इथं यशस्वी झाल्यानं परिसरातील दहा गावात शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. हे पीक केवळ चार महिन्यांचं असून डिसेंबर ते मार्च दरम्यान याची शेती होते." अशी माहिती घातखेड कृषी विज्ञान केंद्राच्या प्रा. डॉ. प्रणिता कडू यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना सांगितली.
आयुर्वेदिक औषधी वनस्पती : " 'रताळे' हे आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यामध्ये पांढरा आणि लाल असे दोन प्रकार आहेत. लाल कंद हे पांढऱ्यापेक्षा अधिक गोड असतात. बाहेरून दोन्ही रताळे सारखे दिसत असले तरी, लाल रताळे हे आतमधून लाल तर, कधी हळदी रंगाचे असतात. ते पचनास हलकं असून मेळघाटमधील महिलांच्या आरोग्यासह लहान मुलांना कुपोषणमुक्त करण्यासाठी उपयुक्त आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे आजार, यासाठी हे कंद उपयुक्त आहे. यात पोटॅशियमसह, मॅग्नेशियम, लोह, व्हिटामिन बी 6, बीटाकैटोरीन हे घटक आहेत." अशी माहिती प्रा. डॉ. प्रणिता कडू यांनी दिली.
हेही वाचा :
- ये हुई ना बात! आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात अंजिराची अमेरी, 'पाणी फाउंडेशन'च्या स्पर्धेत मिळालेल्या रक्कमेचा केला योग्य वापर
- कॉम्प्युटर इंजिनियर युवकाने नोकरी सोडत केली 'रेशीम शेती'; आता वर्षाला लाखोंची कमाई
- नांदेडच्या तरुणानं फुलवली स्ट्रॉबेरी शेती; वर्षाला लाखोंचं उत्पन्न