बीड : मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील गाडीनं महिलेच्या दुचाकीला धडक दिल्यानं मोठा राडा झाला. ही घटना पाटोदा तालुक्यातील कचारवाडी इथं घडली. मात्र हे प्रकरण तिथंच मिटल्यानंतर मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील कार चालकानं सायंकाळी घरात घुसून महिलेला मारहाण केली. तातफ्यातील गाडीला का अडवलेस असा जाब विचारत या महिलेला घरात घुसून काठीनं मारहाण करण्यात आल्याचा आरोप, महिलेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मनोज जरांगेच्या ताफ्यातील गाडीची धडक : मनोज जरांगे यांच्या ताफ्यात असलेल्या गंगाधर काळकुटे यांच्या गाडीनं महिलेच्या दुचाकीला धडक दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाटोदा तालुक्यातील कचारवाडी गावानजीक घडली होती. यात दुचाकीवरील पीडित महिला आणि तिचा मुलगा खाली पडले होते. त्यावेळी शाब्दिक चकमक झाल्यानंतर हे प्रकरण तिथंच थांबलं होतं. मात्र मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील गाडी अडवल्याचा राग या गाडीमधील तरुणांना होता, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला.

महिलेला घरात घुसून काठीनं केली मारहाण : महिलेच्या गाडीला धडक मारलेल्या कारमधील तरुणांनी सायंकाळी महिलेच्या घरी धाव घेतली. यावेळी या तरुणांनी महिलेच्या घरामध्ये घुसून आमच्या ताफ्याच्या गाडीला का अडवलंस? असा जाब विचारत शिवीगाळ केली. यावेळी संतप्त झालेल्या तरुणांनी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली, असा महिलेनं आरोप केला. यावेळी तरुणांनी काठीनं महिलेला मारहाण केल्याची घटना बीडच्या संभाजीनगर भागात घडली. महिलेला मारहाण करण्यात आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली.

तीन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल : मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील गाडीचा दुचाकीला धक्का लागल्यानंतर महिलेला मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर महिलेनं बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन तीन अनोळखी तरुणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे महिलेला घरात घुसून मारहाण करणारे हे हल्लेखोर कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा :