मुंबई :LOK SABHA ELECTION 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष जागा वाटपावरून नाराज असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस काही लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गटावर नाराज आहेत. (Beed Lok Sabha ticket) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत असताना शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे बीड लोकसभा मतदारसंघातून कोणती भूमिका घेणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.
निवडणूक लढावणारच :बीड लोकसभा मतदारसंघातून शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे या निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होत्या. त्यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली होती. ज्योती मेटे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या देखील प्रसारमाध्यमातून झळकत होत्या. मात्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर (Jyoti Mete ) ज्योती मेटे यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे ईटीव्ही भारत सोबत बोलताना म्हणाल्या की, बीड लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने राज्यभरातील शिवसंग्रामचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून त्यांची मते जाणून घेत आहे. वंचित सोबत जायचं का? यावर देखील सध्या चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारल्या संदर्भात आपण योग्यवेळ आल्यानंतर बोलू असंही त्या म्हणाल्या आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचही ज्योती मेटे यावेळी म्हणाल्या. तसंच, येत्या एक ते दोन दिवसांत शिवसंग्राम नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे.
ज्योती मेटे यांनी निवडणूकिला उभे राहू नये :शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छूक होत्या. त्या संदर्भात त्यांची आपल्या पक्षासोबत चर्चा सुरू होती. नेमकी चर्चा कुठं फिस्कटली अशा प्रकारच्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आता त्या अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याबद्दल आदर आहे. विनायक मेटे यांचा आम्हाला आदर आहे. शरद पवारांना जेव्हा त्या भेटायला आल्या तेव्हा त्यांनी स्थानिक परिस्थिती सांगितली. त्यांना त्यावेळेस पवार साहेबांनी आवाहन केलं होतं की, आमच्या या प्रयत्नात आपण सामील व्हावं. शेवटी आत्ताच त्या सरकारी सेवेतून निवृत्त होऊन राजकारणात आल्या आहेत. त्या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांनी गेल्यावेळची निवडणूक लढवली होती. पाच लाखापेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली होती. विजयासाठी प्राथमिक प्रयत्न केले होते. आम्हाला सर्वांना विश्वास आहे की, सोनवणे यांना चांगला प्रतिसाद मिळेल आणि विजय होतील. ज्योती ताई यांना आम्ही विनंती केली की त्यांनी आमच्याबरोबर यावं भविष्यकाळात त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा पक्षाला होईल. पक्ष देखील त्यांचा योग्य सन्मान करेल. त्यामुळे ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून उभे राहू नये अशा प्रकारची विनंती पूर्वी केली असून आता देखील करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
ज्योती मेटे यांच्याकडून संपर्क नाही : शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे बीड लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी पर्यायाची चाचपणी करत आहेत. वंचितसोबत देखील जायचे का? यावरही चर्चा सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी ईटीव्ही भारतने संपर्क साधला असता, ते म्हणाले ज्योती मेटे यांना वंचितकडून ऑफर देण्याबाबत जर-तरच्या बातम्या माध्यमांकडून चालवल्या जात आहेत. मात्र, तसं नाही. तसंच, त्यांनी वंचित म्हणून आपल्याला संपर्क साधला नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसंच, स्थानिक स्तरावर ते चर्चा करताय का याविषयी माहिती नसल्याचे ते म्हणाले आहेत.