सातारा -फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मंजूर करण्यासाठी खासगी इसमांमार्फत पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी फेटाळला आहे. यामुळे संशयित न्यायाधीशांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या वतीनं अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, ॲन्टी करप्शन अधिकारी आणि सरकारी वकीलांची बाजू ऐकल्याशिवाय एकतर्फी निर्णय देता येणार नाही, असं कारण देत गुरूवारी तो फेटाळला होता. दरम्यान, नियमित अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारी झाली. तो जामीन अर्जही प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांनी फेटाळला.
खासगी इसमांमार्फत पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी केलेला अर्ज प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी शनिवारी सायंकाळी फेटाळला. यामुळं न्यायाधीशांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपिल करणार असल्याचं ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी सांगितलं.
न्यायाधीशांविरोधातील गुन्हा हा 'तयार' फिर्यादीवर -लाच प्रकरणातील संशयित आरोपी न्यायाधीश धनंजय निकम यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश निकम यांनी कोणतीही पैशाची मागणी केलेली नाही. किंबहुना त्यांच्यावतीनं पैसे कोणी स्वीकारायचे, हेही समोर आलेलं नाही. तथाकथित लाचेची रक्कम पंचाच्या हातात दिली. गुन्ह्यातील कोणत्याही संशयिताच्या हाती दिलेली नाही. लाचेची मागणी नाही, लाच स्वीकारलेली नाही, संगनमताचं ठिकाण नाही, संगनमतामध्ये काय ठरलं, कोणामध्ये ठरलं, याचा पुरावा नाही. ही 'तयार' केलेली फिर्याद आहे. त्यामुळे आम्ही अटकपूर्व जामीन देण्याची मागणी युक्तिवादात केली होती. मात्र, अर्ज फेटाळल्यानं आम्ही हायकोर्टात अपिल करणार असल्याचं शिरगावकरांनी सांगितलं.