धुळे Journalist Harshal Bhadane: भरधाव ट्रकनं धडक दिल्यामुळे पत्रकार हर्षल भदाणे यांचा जागीच मृत्यू झाला. २९ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यातील गरताडबारी जवळ हा अपघात झाला. ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे हर्षल यांनी घाबरुन बाहेर उडी मारली. ते ट्रकच्या चाकात चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत.
"एका ट्रकनं कारला धडक देत तीन व्यक्तींना उडवल्याची माहिती मिळाली. यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. याच ट्रकनं चाळीसगाव क्रॉस येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील आणखी दोन वाहनांना उडवलं. ट्रकचालक आणि क्लिनर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच ट्रक मोहाळी पोलीस स्टेशन इथं रवाना करण्यात आला." - धीरज महाजन, पोलीस निरीक्षक
नेमका कसा घडला अपघात? : अपघातात मृत्यू झालेले पत्रकार हर्षल भदाणे मुंबईतील एका माध्यम समूहात कार्यरत होते. ते धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी आहेत. सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी उभी होती. त्यावेळी भरधाव ट्रकनं त्यांच्या वाहनाला धडक दिली. स्वःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी वाहनातून उडी मारली. मात्र, सुसाट वेगानं आलेल्या ट्रकच्या चाकाखाली येऊन ते चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.