ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी विनापरवानगी चित्रीकरण पोलिसांकडून केलं जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पत्रकारांनीच ही बाब निदर्शनास आणल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉच ठेवा, अशी टीका आव्हाड यांनी यावेळी केली.
विरोधी पक्षाच्या नेत्यांवर वॉच का? :आमदार जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी एका विषयावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषद सुरू असताना मध्येच या पत्रकार परिषदेत पोलीस घुसले. ठाण्याच्या एसबी (विशेष शाखा)चा एक हवालदार या सर्व पत्रकार परिषदेचे चित्रीकरण करत होता. ही बाब निदर्शनास येताच जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.
प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड (ETV Bharat Reporter)
वाल्मिकी कराडवर वॉच ठेवा : माझ्या घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे? सरकारला नक्की वॉच ठेवून काय करायचं आहे? असे अनेक प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत. पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराडवर वॉच ठेवावा, असा टोला देखील आव्हाड यांनी सरकारला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाडांनी केले सवाल : घराचे चित्रीकरण करणाऱ्या विशेष शाखेच्या पोलिसाला जितेंद्र आव्हाड यांनी अनेक सवाल विचारले. आव्हाड म्हणाले, “तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं घर आहे, माझं खासगी आयुष्य आहे. मग माझ्या घरात कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही? हा माझा अधिकार आहे. तुम्ही कसे आलात?”, असा सवाल आव्हाडांनी पोलिसाला केला. या प्रश्नांवर संबंधित पोलिसाने आपल्याला वरिष्ठांनी सांगितल्याचं म्हटलं.
हेही वाचा -
- संतोष देशमुख हत्याकांड : बीड प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, जितेंद्र आव्हाडांची मागणी
- रुपाली ठोंबरे पाटील यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
- "मारकडवाडी नव्या भारताच्या इतिहासातील आधुनिक दांडी मार्च"; जितेंद्र आव्हाडांचं विधान