मुंबईJitendra Awhad Car Attack : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर आज (1 ऑगस्ट) तीन ते चार जणांनी मुंबईतील पूर्व मुक्त महामार्गाजवळ हल्ला केला. याप्रकरणी तक्रारदार नितीन देशमुख यांनी केलेल्या तक्रारीवरून डोंगरी पोलिसांनी अंकुश कदम आणि धनंजय जाधव या दोघा विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109, 126(2), 189(1), 189(2), 189(4), 61(2)(अ ), 190, 191(1) आणि 191 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काचा फोडून आव्हाडांवर हल्ला :तक्रारदार नितीन देशमुख यांनी नोंदवलेल्या जबाबानुसार, एक्स अकाउंटवर जितेंद्र आव्हाडांच्या वाहनावर हल्ला केल्याचा व्हिडिओ पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय महासचिव आणि आमदार जितेंद्र आव्हाड मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर सहा व्यक्तीवर चाल करून गेले. यानंतर आव्हाडांची गाडी अडवली. गाडीवर दगडफेक करून दांड्याने गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. ते जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करत असल्याचं त्या व्हिडिओत दिसत होते. व्हिडिओ बारकाईने पाहिला असता स्वराज्य संघटना या पक्षाचा पदाधिकारी अंकुश कदम हा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींना हातवारे करून चिथावणी देत असल्याचं दिसत आहे.
'या' कारणानं आव्हाड बचावले :कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. याचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या वाहनाला लक्ष्य केलाचा आरोप केला जात आहे. आमदार आव्हाड हे मुंबईतील कामकाज आटोपून ठाणे येथील घरी परतत होते. त्यांची गाडी पूर्व मुक्त महामार्गाजवळ वाहतूक कोंडीत अडकली असताना दुसऱ्या कारमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्याच्या गाडीवर हल्ला केला. हल्ल्यानंतर आव्हाडांची कार वेगाने पुढे गेल्यानं ते बचावले. विशेष म्हणजे, त्यांच्या कारच्या मागे पोलिसांची गाडी होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.