महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण; शिल्पकार जयदीप आपटेला उच्च न्यायालयाकडून जामीन, अद्याप सुटका नाही - JAYDEEP APTE GRANTED BAIL

जयदीप आपटेला (Jaydeep Apte) १० जानेवारीला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, निकालपत्र आज आल्यानं पुढील गुरुवारी किंवा शुक्रवारी त्याची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

Jaydeep Apte
जयदीप आपटे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2025, 10:36 PM IST

मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या वर्षभरात कोसळल्यानं राज्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी, पुतळ्याचा शिल्पकार असलेल्या जयदीप आपटे (Jaydeep Apte) याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आपटेला जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी हा निर्णय दिला. आपटेतर्फे अ‍ॅड. गणेश सोवनी यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.

जयदीप आपटेला झाली होती अटक : ३५ फूट उंच असलेला हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आपटेला अटक करण्यात आली होती. पुतळा कोसळून कोणालाही दुखापत झाली नव्हती, पुतळा सोसाट्याच्या वाऱ्यामुळं कोसळला असल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आला होता. या प्रकरणात आपला काही दोष नसून आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात आल्याची भूमिका आपटेने घेतली होती. या प्रकरणी तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळं या प्रकरणी आपटेला कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. सोवनी यांनी केला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नसताना त्यासंदर्भातील कलमे लावण्यात आल्याकडं सोवनींनी न्यायालयाचं लक्ष वेधलं होतं.

पुतळा उभारल्यानंतर नौदलातर्फे झालं होतं परीक्षण : हा पुतळा कोसळण्यामध्ये कोणतीही मानवी चूक नसल्याचा दावा जामीन अर्जात करण्यात आला होता. पुतळा उभारल्यानंतर नौदलातर्फे त्याचं परीक्षण करण्यात आलं होतं. त्यावेळी कामात त्रुटी असल्याचं त्यांनी सांगितलं नव्हतं. मात्र, दुर्घटना घडल्यानंतर पीडब्ल्यूडी इंजिनीअरने गुन्हा दाखल केला, याकडं आपटे तर्फे न्यायालयाचं लक्ष वेधलं होतं. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आपटेने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.


जामीन मिळाला, मात्र सुटका पुढील आठवड्यात होणार: "या प्रकरणी आपटेला मुंबई उच्च न्यायालयानं १० जानेवारीला जामीन दिला आहे. मात्र, निकालपत्रावर गुरुवारी १६ जानेवारीला स्वाक्षरी झाली. त्यामुळं अद्याप आपटेची कारागृहातून सुटका झाली नाही. या प्रकरणी निकालपत्राची प्रमाणित प्रत घेऊन त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल. हे निकालपत्र दोन तीन दिवसांत मिळेल. त्यानंतर निकालपत्र सिंधुदुर्गात घेऊन जावं लागेल आणि त्यापुढील कायदेशीर प्रक्रिया करुन आपटे तुरुंगाबाहेर येण्यास पुढील गुरुवार किंवा शुक्रवार उजाडेल," अशी माहिती आपटेचे वकील अ‍ॅड. गणेश सोवनी यांनी दिली.

हेही वाचा -

  1. मालवण पुतळा दुर्घटना; सरकारकडून हात झटकण्याचा प्रयत्न, निकृष्ट बांधकामावर शिवप्रेमी संतप्त - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  2. 'बदलापूर ते मालवण पुतळा दुर्घटना' सर्व घटनांसाठी RSS....; नाना पटोलेंचा गंभीर आरोप - Nagpur Congress Protest
  3. मालवण पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदीप आपटेची मुंबई उच्च न्यायालयात धाव, मंगळवारी होणार पुढील सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details