पुणेJayant Patil :पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज (25 एप्रिल) जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांच्या पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याचा प्रयत्न करू असं म्हटलं आहे. याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, भारतरत्न देण्याची मागणी करता येईल तो जाहीरनाम्याचा विषय नाही. आमची ती फक्त मागणी आहे. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची संपूर्ण राज्याची मागणी आहे. पण प्रॅाब्लेम असा आहे की, दिल्लीत त्यांचं ऐकत नाही, असं म्हणत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. एकनाथ खडसे आता तुमच्या पक्षात आहे का? याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, एकनाथ खडसे आमच्याकडून गेले आहेत. त्यांनी आमच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांनी तर जाहीररीत्या तसं सांगितलं होतं. आता ते आमच्या पक्षात नाही, असं यावेळी पाटील म्हणाले.
छगन भुजबळांबद्दल काय म्हणाले जयंत पाटील?:अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, आमच्याशी काहीही चर्चा सुरू नाही; पण त्यांची तिथं महायुतीत अवहेलना होत आहे असं दिसत आहे. त्याबाबत आम्हालाही खेद वाटत आहे. दिल्लीने सूचना केल्या म्हणून ते नाशिक मधून उभे राहणार अशी चर्चा सुरू झाली आणि मग ऐन वेळी त्यांना माघार घ्यावी लागली. एक जुने सहकारी म्हणून आम्हाला त्याबाबत खेद वाटत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.