जालना - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी सातव्यांदा अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू होतं. काल सहाव्या दिवशी हे उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, आमरण उपोषण स्थगित करतोय. आता यापुढे उपोषण होणार नाही, तर आता समोरासमोर लढाई लढणार. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये देऊन त्यांना सरकारी नोकरीत घ्या. काही झालं तरी आम्हाला सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सरकार दगा फटका करणार नाही असं वाटतं. जर मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मी मुंबईला जायची तारीख जाहीर करणार असं सांगून जरांगे पाटील यांनी सरकारला कडक इशारा दिलाय.
बीडमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन केलं. धनंजय मुंडेंकडे असलेल्या मंत्रिपदामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना संरक्षण आणि व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. मनोज जरांगेंनी सरकारकडे बोलण्याची जबाबदारी द्यावी आम्ही जबाबदारी पार पाडू असंही यावेळी क्षीरसागर यांनी म्हटलंय.