अमरावती : अमरावती शहरात कुष्ठरोगी बांधवांसाठी पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी 1946 मध्ये स्थापन केलेल्या तपोवनच्या परिसरात जपानी शैलीतलं एक आगळ वेगळं छोटंसं महादेव मंदिर (Mahadev Mandir Temple) या परिसरात येणाऱ्यांचं लक्ष वेधत आहे. ब्रिटिशांचे तीन टोप जणू एकमेकांवर ठेवून या मंदिराचं छत बांधण्यात आलं असं हे भासतं. या छताखाली चारही बाजूंनी लाकडांनी उभारलेले चौदा स्तंभ आणि त्यावर जपानी शैलीतील कलाकृती भुरळ घालणारी आहे. जपानी शैलीतील या मंदिरात शिवलिंगाचं दर्शन होतं. अमरावतीत हे जपानी शैलीतलं मंदिर नेमकं कधी आणि कसं उभारण्यात आलं यासंदर्भात "ईटीव्ही भारत" चा हा स्पेशल रिपोर्ट.
असा आहे मंदिराचा इतिहास: समाजानं नाकारलेल्या कुष्ठरोगी बांधवांना जगण्याचा अधिकार मिळावा आणि त्यांच्या आजारावर इलाज व्हावा या उद्देशानं पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी 1946 मध्ये अमरावती शहरालगत तपोवन या संस्थेची स्थापना केली. कुष्ठरोगी बांधवांचं जणू एक छोटसं आणि सुंदर असं गावच डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी या परिसरात वसवलं. या परिसरात अनेक मंदिरं उभारण्यात आली. त्यापैकीच एक म्हणजे तपोवनात असणारं महादेवाचं मंदिर. 1946 मध्येच महादेवाचं मंदिर तपोवन परिसरात बांधलं असलं तरी, हे मंदिर आज ज्या जपानी शैलीत उभारलेलं दिसतं, ते मात्र 1974-75 मध्ये खास निर्माण करण्यात आलं असल्याची माहिती, तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवई यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.
या मंदिराची अशी समोर आली संकल्पना : विदर्भ महारोगी संस्थान तपोवनच्या अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या कन्या अनुताई भागवत या कुष्ठ रुग्णांच्या पुनर्वसना संदर्भात 1968-69 मध्ये जपानच्या अभ्यास दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जपानमध्ये लाकडाच्या संरचनेद्वारे उतरत्या छपरांचे तीन-चार थर असणारी मंदिरं पाहिली. या मंदिरांच्या चार बाजूंनी विटा-सिमेंटची भिंती नव्हे तर लाकडांमध्ये कोरीव बांधकाम करून मंदिरात प्रवेशासाठी तिन्ही बाजू उघड्या ठेवलेल्या. तर मंदिरात मूर्ती असणारी बाजू लाकडाच्या भिंतीत उभारण्यात आल्याचं त्यांनी पाहिलं. जपानच्या विविध भागात असणारी ही मंदिरं चिनी आणि जपानी या दोन संस्कृतीमधील बांधकामाचं वैशिष्ट्य असणारी आहेत. भारतात परतल्यावर आपल्या तपोवनात जपानमध्ये असणाऱ्या मंदिरासारखंच छोटसं आणि आकर्षक मंदिर उभारावं अशी कल्पना त्यांना आली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी महादेवाचं छोटसं मंदिर होतं. त्याच ठिकाणी 1971-72 मध्ये जपानी शैलीतील हे खास आगळवेगळं मंदिर उभारण्यात आलं असं प्रा. डॉ. सुभाष गवई यांनी सांगितलं.