मुंबई :जळगावजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानं रेल्वेतील प्रवाशांनी रुळावर उड्या मारल्या. मात्र समोरुन येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं चिरडल्यानं त्यातील 13 निष्पापांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमुळे मुंबईत तीन दशकांपूर्वी घडलेल्या भयानक दुर्घटनेचे जुन्या मुंबईकरांना स्मरण झालं. त्या दुर्घटनेत तब्बल 49 महिलांना प्राण गमवावे लागले होते. महिलांच्या डब्यात आग लागल्याची अफवा सरली आणि पाहता पाहता महिलांनी बाहेर उड्या घेतल्या. या अपघातात तब्बल 49 महिलांचा बळी गेला होता.
मुंबईत लोकलमधून उड्या मारल्यानं 49 महिला प्रवाशांचा बळी :मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकातून लेडीज स्पेशल उपनगरीय लोकल बोरीवलीच्या दिशेनं निघाली. मात्र त्या लोकलमधील 49 महिला प्रवाशांचा शेवटचं स्थान गाठण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. बोरीवली स्थानक येण्यापूर्वी लोकल कांदिवली स्थानकापुढं गेली. यावेळी त्या लोकलमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. आगीची अफवा पसरताच महिला प्रवाशांमध्ये हलकल्लोळ उडाला. महिला प्रवाशांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता जीव वाचवण्यासाठी वेगात असलेल्या धावत्या लोकलमधून उड्या मारल्या. प्रत्येक जण जीवाच्या आकांतानं लोकलबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र दुर्दैवानं त्यांची अवस्था 'आगीतून फुफाट्यात' सापडल्यासारखी झाली. समोरील दिशेनं आलेल्या लोकलनं या रुळांवर उड्या मारलेल्या महिलांना चिरडलं. त्यावेळी पावसानं देखील रौद्र रुप धारण केलं. या दुर्घटनेत 49 महिलांना जीव गमवावा लागला.