महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इटलीचा तरुण किर्रर अंधारात गाविलगड किल्ल्यावर भरकटला: ध्यान साधना करताना घडली 'ही' घटना - ITALIAN TOURIST YOUTH GOT LOST

इटलीचा पर्यटक तरुण गाविलगड किल्ल्यावर भरकटल्यानं मोठी खळबळ उडाली. हा तरुण भयाण अंधारात गाविलगड किल्ल्यावर भरकटल्यानं त्याला स्वराज्य सेवा प्रतिष्ठान तरुणांनी बाहेर काढलं.

Italian Tourist Youth Got Lost
गाविलगड किल्ल्यावर भरकटलेला अँजिलिओ (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2025, 7:23 AM IST

Updated : Jan 7, 2025, 8:53 AM IST

अमरावती : थेट इटलीवरुन चिखलदरा येथील गाविलगड किल्ला पाहण्यासाठी आलेला तरुण रात्रीच्या अंधारात गाविलगडावर भरकटला. परदेशी पर्यटक किल्ल्यातून बाहेर पडला नाही, अशी माहिती कळताच स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे सहा कार्यकर्ते किल्ल्यात शिरले. जंगली श्वापदांची भीती असणार्‍या गाविलगड किल्ल्यात दिल्ली दरवाजा समोर असणाऱ्या छोट्या मशीद परिसरात हा इटलीचा पाहुणा सुखरुप आढळला. घनदाट जंगलानं वेढलेला हा परिसर किती धोकादायक आहे, याची जाणीव स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्याला करून दिली. किल्ल्याबाहेर आणून त्याची राहण्याची व्यवस्था करत त्याला मोठा आधार दिला. अँजिलिओ असं गाविलडच्या किल्ल्यावर भरकटलेल्या इटालियन तरुणाचं नाव आहे. मेळघाटात थेट चिखलदरा इथं एकटाच आलेल्या या इटलीच्या तारुणासंदर्भात 'ईटीव्ही भारत' चा Exclusive रिपोर्ट.

किल्ल्यात करत होता ध्यान साधना :इटली येथील रहिवासी असणारा अँजिलिओ हा तरुण रविवारी सकाळी दहा वाजता चिखलदरा इथं पोहोचला. सकाळी साडेअकरा वाजता त्यानं गाविलगड किल्ला पाहण्यासाठी रितसर तिकीट घेतलं. आपल्या जवळची बॅग तिकीट काउंटरवर ठेवून त्यानं किल्ल्यात प्रवेश केला. सायंकाळी साडेचार वाजता तो किल्ल्याबाहेर पडला. त्यानं पिण्याच्या पाण्याच्या दोन बॉटल घेतल्या आणि किल्ल्याच्या काही भागातील फोटो घ्यायचे राहिलेत असं म्हणत परत किल्ल्यात जाऊ देण्याची विनंती त्यानं तिकीट काउंटरवर केली. यानंतर तो पाच वाजता पुन्हा किल्ल्यात शिरला. सहा वाजता किल्ला बंद होतो. किल्ल्याच्या आत असणारे सर्व पर्यटक बाहेर पडलेत, मात्र परदेशी पाहुणा किल्ल्याबाहेर आलाच नाही. किल्ल्याच्या तिकीट काउंटरवर असणारा गोपाल आणि राकेश या दोघांनाही त्याच्याबद्दल काळजी वाटायला लागली. या परदेशी व्यक्ती संदर्भात त्यांनी सेवा स्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य राकेश महल्ले यांना माहिती दिली. राकेश महल्ले यांनी आपल्या पाच मित्रांसह सायंकाळी सात वाजता किल्ल्यात जाण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या किर्रर अंधारात दिल्ली दरवाजापर्यंत मोठ्या हिमतीनं राकेश महल्ले आपल्या मित्रांसह पोहोचले. दिल्ली दरवाजापासून काही अंतरावर त्यांनी जोरात आवाज दिला असता, लगतच असणाऱ्या छोट्या मशीद परिसरातून पांढरा शुभ्र रंग असणाऱ्या परदेशी युवकानं त्यांना साद घातला. राकेश महल्ले यांनी त्या युवकाला आम्ही तुझ्या मदतीसाठी आलोत असा विश्वास दिला. रात्री अंधारात हे ठिकाण माणसांसाठी सुरक्षीत नाही याची जाणीव त्याला करून दिली. यानंतर राकेश महल्ले यांनी आपल्या मित्रांसह परदेशी पाहुण्याला रात्री साडेनऊच्या सुमारास किल्ल्याबाहेर आणलं.

इटलीचा तरुण किर्रर अंधारात गाविलगड किल्ल्यावर भरकटला (Reporter)

पोलीस पोहोचले किल्ला परिसरात :परदेशी युवक किल्ल्यातून बाहेर आलाच नाही, याबाबत माहिती मिळताच चिखलदरा पोलीस किल्ला परिसरात पोहोचलेत. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास राकेश महल्ले यांनी परदेशी युवकाला किल्ल्याबाहेर आणल्यावर पोलिसांनी त्याची विचारपूस केली. त्याचं नाव अँजिलिओ असून तो इटलीचा रहिवासी असल्याचं स्पष्ट झालं. इटलीतील हा तरुण मुंबईत आला. मुंबईवरून त्याचा प्रवास सुरू झाला आणि रविवारी तो चिखलदरा इथं पोहोचला. त्याला इटालियन आणि स्पॅनिश या दोन भाषा येतात, तर इंग्रजी तोडकिमोडकी तो बोलतो, असं लक्षात आलं. या युवकाला कुठलाही त्रास होऊ नये, अशी काळजी घ्यावी, असं पोलिसांनी सांगितल्यावर राकेश महल्ले यांनी या परदेशी पाहुण्याची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली.

सोमवारी इटालियन तरुणानं पुन्हा पाहिला किल्ला :सेवा स्वराज्य प्रतिष्ठानचे राकेश महल्ले यांनी अँजिलिओ या इटालियन तरुणाची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. यासोबतच त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण संवाद साधला. राकेश महल्ले यांच्यासह स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांनी सोमवारी सकाळी या इटालियन तरुणाला पुन्हा गाविलगड किल्ला फिरायला नेलं. या किल्ल्याची संपूर्ण माहिती त्याला सांगितली. यानंतर अँजिलिओला चिखलदरा शहरातील विविध टुरिस्ट पॉईंट देखील दाखवण्यात आले. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घरून आणलेल्या जेवणाच्या डब्यवरच अँजिलिओ यानं ताव मारला. सायंकाळी राकेश महल्ले यांनी आपल्या घरी त्याला नेलं, या ठिकाणी परिसरातील चिमुकल्यांनी त्याच्याशी संवाद साधला.

इटलीच्या पर्यटकाच्या बॅगमध्ये भगवद्ग गीता :इटलीतून आलेल्या अँजिलिओ या तरुणाकडं भारतात राहण्याचा विजा हा 31 डिसेंबर 2025 पर्यंतचा आहे. त्याच्याजवळ भगवद्गीतेची प्रत देखील आहे. अँजिलिओ हा चिखलदाराला येण्यापूर्वी संभाजीनगरला मुक्कामी होता. त्या ठिकाणी काही व्यक्तींनी त्याची फसवणूक केल्यामुळे चिखलदरा इथं आल्यावर रात्री किल्ल्यातच राहायचं असा निर्णय आपण घेतला, असं विश्वास निर्माण झाल्यावर अँजिलिओ यानं सांगितलं असल्याची माहिती राकेश महल्ले यांनी" ईटीव्ही भारत"शी बोलताना दिली.

इटालियन पाहुणा म्हणाला हा थरारक अनुभव :"रविवारी मी किल्ला पाहण्यासाठी आलो. किल्ला पाहताना मला किल्ल्यातच वेळ झाला. अंधार पडल्यामुळे मला काही सूचेना. किल्ल्यावर चारी बाजूनं काळोख असताना टॉर्च घेऊन राकेश, आकाश ही मंडळी मला शोधायला आली. या मंडळींनी मला किल्ल्याबाहेर आणलं. किल्ल्याबाहेर पोलीसही आलेत. पोलिसांनी सौजन्यपूर्ण संवाद साधला. राकेश यांनी मला मदत केली. रात्री राहायला घर दिलं. मी नेमकी काय चूक केली हे देखील राकेश यांनी पटवून सांगताच मी खरंच किती धोकादायक ठिकाणी होतो, याची जाणीव करून दिली. आज मी सुरक्षित आहे. या सगळ्यांनी माझी काळजी घेतली. आज मी संपूर्ण चिखलदऱ्यात फेरफटका मारला. पुन्हा एकदा किल्ला फिरायला आलो. या ठिकाणी किल्ल्याची माहिती असणारे शिवा काळे यांनी मला किल्ल्याबाबत मार्गदर्शन केलं. चिखलदरा येथील हा अनुभव अतिशय छान आणि थरारक होता," अशा भावना अँजिलिओ यानं व्यक्त केल्या.

हेही वाचा :

  1. गवतासाठी चढावा लागतो मेळघाटातील गाविलगडचा किल्ला; तीन गावातील गवळी बांधवांची रोज मरणयातनांची 'चढाई'
  2. गाविलगडावर सहा दरवाजे; दरवाजावर आहेत हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या समृद्धीचं प्रतीक
  3. घनदाट जंगलातून उंच गडावर चढाई, इतिहासातील आठवणींना उजाळा देत गाविलगड महोत्सवाला प्रारंभ
Last Updated : Jan 7, 2025, 8:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details