मुंबई Israeli Minister Miri Regev Visits Coastal Road : मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामुळं मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असा दावा मुंबई महापालिकेनं केलाय. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर ही एक मोठी बाजारपेठ आहे. इथं तुम्हाला देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून खरेदीदार या बाजारपेठेत आलेले दिसतील. या बाजारपेठांमधील असुविधांचा फटका विक्रेत्यांसोबतच नागरिकांनाही बसतो. यात वाहतूक कोंडी हा मुख्य अडथळा ठरतो. याच वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पालिकेनं कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाचा पाहिला टप्पा आता पूर्ण झाला. या प्रकल्पाची इस्त्राईलच्या रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव्ह यांनी पाहणी केलीय.
काय म्हणालं महापालिका प्रशासन : यासंदर्भात मुंबई महापालिका प्रशासनानं सांगितलं की, कोस्टल रोड प्रकल्पाला इस्त्राईलच्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षा मंत्री मिरी रेगेव यांनी आज भेट दिली. या सोबतच मिरी रेगेव्ह यांनी हाजी अली येथील आंतरमार्गिका, प्रियदर्शनी पार्कपासून ते पारसी जिमखान्यापर्यंत भूमिगत बोगद्याची पाहणीही केली. यावेळी मंत्री मिरी रेगेव यांनी पालिकेच्या या प्रकल्पाचं कौतुक केल्याची माहितीदेखील प्रशासनानं दिलीय. मंत्री मिरी रेगेव म्हणाल्या, "या प्रकल्पाची भव्यता डोळे दीपवून टाकणारी आहे. मुंबईला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचा दळणवळणासाठी योग्य वापर केलाय. कामाची गुणवत्ता अनुकरणीय आहे. उड्डाणपूल, भूमिगत बोगदे, त्यात अत्याधुनिक यंत्रणा यांचा समावेश हे सर्व कौतुकास पात्र आहे." अशा शब्दात कामाचं कौतुक केल्याचं पालिकेनं म्हटलंय.