नागपूर International Yoga Day 2024 : भारतानं जगाला दिलेल्या सर्वात अमूल्य भेटींपैकी एक भेट म्हणजे 'योग साधना' होय. आज (21 जून) जगभरात 'आंतरराष्ट्रीय योग दिन' अत्यंत उत्साहात साजरा केला जातोय. योगसाधना शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. यंदाचा हा 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन असून यानिमित्तानं लोकांना योगासनाचं महत्व पटवून देण्यासाठी देशभरात योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तर याच पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'नं आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळेशी संवाद साधला. संवादादरम्यान धनश्रीनं निरोगी आरोग्याचा कानमंत्र देखील सांगितलाय.
आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे मुलाखत (Source reporter) योग दिन आयुष्यभर साजरा करावा :यावेळी धनश्री म्हणाली, "आज केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात योग दिन साजरा केला जातोय. मात्र, योग साधना फक्त एक दिवस करुनच त्याचा फायदा होत नाही तर चांगल्या आरोग्यासाठी रोज योगासनं करावी. कोरोना काळात अनेकांना योगाभ्यासाचे फायदे कळाले. त्यामुळं केवळ एक दिवसच नाही तर आयुष्यभर योग दिन साजरा करावा".
कोण आहे धनश्री लेकुरवाळे :वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी योगाभ्यासाला सुरुवात करणाऱ्या नागपूरच्या धनश्री लेकुरवाळे यांनी योगामध्ये आपला ठसा उमटवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिनं गेल्या काही वर्षात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून अनेक पदकं पटकावली. धनश्रीनं आत्तापर्यंत देशासाठी तब्बल 22 पदकांची मौल्यवान कमाई केली आहे. इतकंच नाही तर राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये तिनं 50 हून अधिक पदकं जिंकली आहेत. तसंच तिला विविध संस्थांकडून 40 पेक्षा जास्त पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.
200 हून अधिक मुलींना देते योग शिक्षण : योगाभ्यास क्षेत्रात करिअर घडवणारी धनश्री लेकुरवाळे ही आज नागपुरातील 200 हून अधिक शाळकरी मुलींना योगाभ्यासाचे धडे शिकवत आहे. या प्रयत्नातून येत्या काळामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करणार असल्याचं धनश्रीनं म्हटलंय. तसंच प्राचीन योगासनं करणं काही प्रमाणात लोकांना बोरिंग वाटत होतं. मात्र, आता त्याला मॉडर्न योगासनाची जोड मिळाल्यानं लहान-मोठे सर्वच योगाभ्यासाकडं वळू लागले आहेत. तसंच हळू-हळू योगसाधनेचे बहुआयामी फायदे देखील लोकांना पटू लागले आहेत.
हेही वाचा -
- आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 : उंच बर्फाळ प्रदेशात भारतीय जवानांची योगासनं - International Yoga Day 2024
- ''योग फक्त विद्या नाही, विज्ञान आहे''-पंतप्रधान नरेंद्र मोदी - PM Modi on Yoga
- 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चा काय आहे इतिहास, जाणून घ्या, योगचे महत्त्व आणि फायदे - International Yoga Day 2024