मुंबई Lok Sabha Election 2024:20 मे रोजी मुंबईतील सर्व मतदारसंघात लोकसभा निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 3 मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अशा परिस्थितीत भाजपाकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अजूनही उमेदवाराची घोषणा झाली नाही. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या नावाला भाजपाकडून अंतर्गत विरोध असल्याकारणानं त्यांचा पत्ता यंदा कट होणार, असं खात्रीलायक सांगितलं जात आहे. दुसरीकडं महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष, आमदार वर्षा गायकवाड यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे. असं असताना दोन वेळा सतत या मतदारसंघातून खासदारकी भूषविलेल्या पुनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्याचं नेमकं कारण काय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
पूनम महाजन यांची हॅट्रिक हुकणार? :भाजपा पक्षश्रेष्ठीनं यंदा मुंबई मधून उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर पूर्वचे विद्यमान खासदार मनोज कोटक या दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. अशात आता मुंबईसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना मुंबई उत्तर मध्य, मध्य लोकसभा मतदारसंघात अजूनही भाजपानं उमेदवाराची घोषणा केली नाही. याचाच दुसरा अर्थ या मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट होणार आहे. पुनम महाजन यांचा पत्ता भाजपानं कट केल्यास मुंबईतील भाजपाच्या विद्यमान तिन्ही खासदारांचे पत्ते कापले जाणार आहेत. विशेष म्हणजे पुनम महाजन यांना पुन्हा उमेदवारी नाकारण्याचं कारण म्हणजे त्यांच्याच मतदारसंघातून भाजपाकडूनच त्यांना होत असलेला अंतर्गत विरोध आहे. महाजन यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर भाजपा नेते समाधानी नाहीय. त्यांच्या कामकाजाच्या अनेक तक्रारी पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यातच राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे या कारणासाठीसुद्धा पूनम महाजन यांच्या जागी दुसऱ्या चेहऱ्याच्या शोधात भाजपी नेतृत्व आहे. या कारणास्तव पूनम महाजन यांची विजयाची हॅक्ट्रिक करण्याची संधी यंदा हुकणार आहे.
पूनमच्या जागी कोण? :पूनम महाजन यांच्याजागी उमेदवारीसाठी भाजपा पक्ष नेतृत्वाकडून भाजपाचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांचे नाव चर्चेत आहे. आशिष शेलार यांचं मुंबईतील नेटवर्क फार मोठं आहे. त्यातच उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्ला करण्यात आशिष शेलार नेहमी पुढं असतात. परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आशिष शेलार यांना दिल्लीला हलवणं उचित होणार नाही, असा एक मतप्रवाह भाजपा नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. भाजपा आमदार अमित साटम तसंच प्रसिद्ध विधीतज्ञ उज्वल निकम यांच्याही नावाची चर्चा आहे. या विषयावर बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार म्हणाले की, पक्षामध्ये याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला गेला, असून पक्ष देईल तो आदेश सर्वांना पाळावा लागणार आहे. याबाबत लवकरच योग्य त्या उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पद्धतीचा संभ्रम नसून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी योग्य पद्धतीने कामाला लागले आहेत.
असा आहे मतदारसंघ :उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये चांदिवली, विलेपार्ले, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम व कलीना या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये चांदिवली येथे शिवसेना शिंदे गटाचे दिलीप मामा लांडे, कुर्ला येथे शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर, वांद्रे पश्चिम मध्ये भाजपचे आशिष शेलार, विलेपार्ले मध्ये भाजपाचे पराग अळवणी अशाप्रकारे चार महायुतीचे आमदार आहेत. तर कुर्ला येथे शिवसेना उबाठा गटाचे संजय पोतनीस हे आमदार असून वांद्रे पूर्व येथील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांना पक्षातून बाहेर काढलं आहे. अशा परिस्थितीत या मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. या मतदारसंघात सर्वधर्मीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून मराठी मतांची टक्केवारीसुद्धा मोठी आहे. या मतदारसंघात ३४ टक्के मराठी भाषिक आहेत. तर 24 टक्के मुस्लिम व 15 टक्के उत्तर भारतीय असून 11 टक्के गुजराती व मारवाडी तर 9 टक्के दक्षिण भारतीय 5 टक्के ख्रिश्चन आहेत.
हे वाचलंत का :
- नेत्यांच्या चकरा अन् हेलिकॉप्टरच्या घिरट्यांमध्ये वाढ; निवडणुकीच्या काळात आलाय भाव, किंमती जाणून बसेल धक्का - Lok Sabha election 2024
- 'गादी विरुद्ध मोदी'! प्रचाराचा धुरळा, कोल्हापुरात कुणाची हवा? सोशल मीडियावर रंगलं 'वॉर' - Lok Sabha Election 2024
- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान संपलं, अनेक दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद - Lok Sabha Election Phase 2